लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तरुणाईने ‘जोश-ए-वतन बढाए जा’ या भावनेने तीन हजारापेक्षा अधीक जणांनी अॅण्टी कोविड फोर्ससाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. सोबत एनसीसी विद्यार्थी, शिक्षक आणि नेहरु युवा केंद्राच्या सदस्यांनीदेखील यात सहभाग घेतला आहे.जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादीत असल्याने सुरक्षेवर बराच ताण पडतो. शिवाय या संकटाच्या काळात अनेक ठिकाणी मदतीसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी एसीएफची संकल्पना राबविण्याचे निश्चित केले. त्याला नेहरु युवा केंद्र आणि शिक्षकांकडून तात्काळ प्रतिसाददेखील मिळाला. एनवायकेचे १८३ सदस्य, १६१ शिक्षक आणि एनसीसीच्या ६१ विद्यार्थ्यांनी एसीएफमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली. गावपातळीवरदेखील मनुष्यबळची आवश्यकता असल्याने तिथल्या युवकांना सहभागी करून घेण्यासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा करून देण्यात आली. नोंदणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी फेसबुक संवादाद्वारे केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत २ हजार ८४७ स्वयंसेकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक १,१५४ नंदुरबार, ७८६ शहादा, ३६८ नवापूर, ३०१ तळोदा, १६७ अक्कलकुवा आणि ७१ व्यक्तीं तळोदा तालुक्यातील आहेत. यातील बहुतेक २० ते ३० वयोगटातील तरुण आहेत. पोलीसांना मदतीसाठी १,४९८ क्वॉरंटाईन केंद्राची देखरेख ४८, निवारा केंद्र ५२, स्वच्छता कार्य ८८, नगरपालिकेला सहकार्य ८२ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी ३४१ स्वयंसेवकांनी तयारी दर्शविली आहे. फेसबुकच्या माध्यमातूनदेखील अनेक तरुणांनी आपले मोबाईल क्रमांक देऊन सहकार्याची तयारी दर्शविली आहे. देशभक्तीच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आपण काही वाटा उचलू इच्छितो अशा आशयाच्या प्रतिक्रीया युवकांनी दिल्या आहेत.काहींनी वाहन सुविधा, जीवनावश्यक वस्तू देण्याची तयारी दर्शविली आहे. तर लॉकडाऊनमुळे गावाकडे आलेल्या सुरक्षा रक्षकांनीदेखील यात सहभाग घेण्याचे मान्य केले आहे. विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींनीदेखील सेवा कार्यात सहभागी होण्याची तयारी असल्याचे कळविले आहे. जिल्हा वारकरी संप्रदायातील सदस्यांनी सेवाकार्यात रस दाखविला आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून संकटाच्यावेळी जिल्हा एक झालेला दिसून येत आहे. सर्व जाती-धर्मातील स्वयंसेवक स्वत:हून पुढे येत आहेत. साधारण तरुण आणि कुठलाही आजार नसलेल्या स्वयंसेकांची निवड करून त्यांना त्यांच्याच गावात किंवा परिसरातील भागात जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.सहाय्य करणारे मनुष्यबळ असे त्यांचे स्वरुप असेल. त्यांना पांढरा गणवेश देण्यात येणार असून कार्य सुरू करण्यापूर्वी आवश्यक प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे. इच्छुक तरुणांनी लिंकवर माहिती भरून उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा शिक्षक परिषदेने आपल्या सदस्य असलेल्या प्राथमिक शिक्षकांना जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले आहे. त्याकरीता राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे व जिल्हाध्यक्ष आबा बच्छाव यांनी प्रत्येक शिक्षक सदस्याला वैयक्तिक पत्र व मेसेज देत आवाहन केले आहे.अनेक तरूण युवक पोलीस बंदोबस्ताशिवाय क्वॉरंटाईन केंद्रातील देखभाल, जीवनावश्यक वस्तू वाटप, स्वच्छता कार्य यासाठी देखील सहभाग देण्यासाठी पुढे आले आहेत.