जिल्हा रुग्णालयाशी तीन वर्षाचा करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:49 AM2019-01-11T11:49:52+5:302019-01-11T11:49:57+5:30
मेडीकल कॉलेज : सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्व विभाग होणार हस्तांतरण
नंदुरबार : जिल्हा रुग्णालय वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे हस्तांतरीत होणार असून यातील अनेक विभाग व कर्मचारी मात्र प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू होत नाही तोर्पयत जिल्हा रुग्णालयाच्या अर्थात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीपत्याखालीच राहणार आहेत. दरम्यान, काही कर्मचारी तातडीने वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रतिनियुक्त करण्यात आले आहेत.
नंदुरबारात 100 प्रवेश क्षमतेचे व 500 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले आहे. त्याचा अद्यादेश आणि जिल्हा सामान्य रुग्णलय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्याच्या निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत होणार असले तरी सद्या असलेल्या सेवा जैसे थे राहणार असून त्यात कुठलाही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या अडीचशे खाटा आहेत. याशिवाय महिला रुग्णालयात 100 खाटा आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी निकषांची पुर्तता करण्यासाठी जिल्हा ुरुग्णालयाचे हस्तांतरण आवश्यक होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी इमारत व जागेचा ताबा हा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावावर राहणार आहे. तीन वर्षाचा करार नवनियुक्त अधिष्ठाता अर्थात डीन करतील. तीन वर्षात महाविद्यालय सुरू होणे आवश्यक राहणार आहे.
रुग्णालय इमारतीमधील दहा हजार चौरसफूट क्षेत्र सार्वजनिक आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात येणार आहे. नेत्र विभाग व फिरते नेत्र पथक हे पूर्वीप्रमाणेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारीत राहील. वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र नेत्र चिकित्सा शास्त्र विभाग, शासकीय महाविद्यालय यांच्याकडे राहील व ते स्वत: अधिष्ठाता यांच्या नियंत्रणाखाली काम पाहतील.
अपंगत्व तपासणी मंडळ गट अ व गट ब अधिका:यांठीची वैद्यकीय मंडळे पूर्वीप्रमाणेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारीत राहतील. अस्थिव्यंगोपचार शास्त्र, कान-नाक व घसा शास्त्र, औषधी वैद्यकशास्त्र, मानसोपचार शास्त्र आदी विभागातील तज्ज्ञ त्यांना तांत्रिक तज्ज्ञ अभिप्राय मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येतील.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक हे प्रतिनियुक्तीने अधिष्ठाता यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वैद्यकीय अधिक्षक म्हणून रुग्णालयाचे कामकाज पहातील. स्पेशन न्यू बॉर्न केअर युनिट, डायलेसीस आणि डीआयसीई याचे नियमित तांत्रिक कर्मचारी वर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचा राहणार आहे.
ही पदे राहतील कायम
सार्वजनिक आरोग्य विभागाकडे रुग्णालयातील पुढील पदे कायम राहणार आहेत. त्यात जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, सर्व गट अ विशेषज्ज्ञ, लघुटंकलेखक, शिपाई व सार्वजनिक आरोग्य परिचारीका. रुग्णालयीन प्रशिक्षण पथकातील वैद्यकीय अधिकारी वर्ग एक, सांख्यिकी सहायक, शिपाई, प्रशासकीय विभागातील प्रशासकीय अधिकारी वर्ग दोन, कार्यालयीन अधीक्षक वर्ग तीन, वरिष्ठ लिपीक वर्ग तीन, कनिष्ठ लिपीक , टंकलेखक वर्ग तीन, लेखापाल, सहायक पर्यवेक्षक एक, भांडारपाल तथा वस्त्रपाल, वाहन चालक. औषधी भंडारमधील औषध निर्माण अधिकारी याचा समावेश राहणार आहे.
कॉलेजकडे हस्तारीत पदे
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, लघुटंकलेखक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, टंकलेखक, लेखापाल, भांडारपाल, शिपाई.
ओपीडीमधील सर्व गट अ वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढी, प्रयोगशाळा, सर्व वॉर्डस, क्ष किरण व सोनोग्राफी, भौतिक उपचार विभाग, नवजात शिशू विभाग, अतिदक्षता विभाग, ट्रामाकेअर युनिट, ऑपरेशन थिअेटर, डायलिसीस विभाग, पोस्टमॉर्टम विभाग, अपघात विभाग, किचन विभाग याचा समावेश आहे.