पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलधारा कोसळत असल्यामुळे नदी-नाल्यांना पुरासह डोंगरातील धबधबे प्रवाहित होतात. अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात वर्षा पर्यटन मोठ्या प्रमाणात बहरले आहे. सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम भागातील अनेक धबधबे प्रवाहित झाल्याने या ठिकाणी साधनसुविधा नसल्या तरी पावसाळ्यात पर्यटन करीत आनंद साजरा करण्याचा कल तरुणांमध्ये विशेष आढळून येतो. या पर्यटनस्थळी आपले छायाचित्र काढण्याची ओढ आबालवृद्धांमध्ये असते. धबधब्यांसमोर मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी अनेक साहसी पर्यटक आपला जीव धोक्यात घालून मनाजोगे फोटोसेशन करतात. दुर्दैवाने जिल्ह्यातील काही धबधब्याच्या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पर्यटनस्थळांचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर सेल्फीचा मोह टाळावा, अथवा आवश्यक ती काळजी घ्यावी ही काळाची गरज आहे.
पर्यटनाला जा मात्र काळजी घ्या...
धडगाव तालुक्यातील बिलगावजवळ मोठा धबधबा आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा धबधबा असल्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. विशेषत: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात या धबधब्याचा प्रवाह कायम असतो. म्हणून पर्यटक व निसर्गप्रेमी मनमुराद आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येतात. उदय नदीवर असलेला बिलगाव येथील धबधबा गेल्या काही वर्षांत पर्यटकांसाठी अक्षरश: जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तेथे संरक्षण भिंत व सूचना फलक तातडीने लावावे, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक व ग्रामस्थांनी केली आहे.
वाल्हेरी धबधबा पर्यटकांसाठी पर्वणीच
तळोदा तालुक्यातील वाल्हेरी माता मंदिर परिसरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या दऱ्या-खोऱ्यांतून कोसळणारे धबधब्याचे पाणी, नागमोडी वाटा, कच्चा रस्ता, पक्षांची किलबिलाट, हिरवा शालू नेसलेल्या टेकड्या असे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना एक मेजवानीच ठरत आहे. पावसाचे प्रमाण कमी असले तरीही या धबधब्यावर कुठलाही परिणाम होत नाही. येथे चहूबाजूने वेढलेल्या हिरव्यागार टेकड्या, वृक्ष, वेली या निसर्गाच्या सान्निध्यामुळे या धबधब्याचे सौंदर्य खुलून दिसते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.
राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ येथील सीताखाई धबधबा हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात यशवंत तलावातील पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे दरवर्षी हा धबधबा प्रवाहित होतो. सुमारे ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळणाऱ्या जलधारा आणि त्यांचे फेसाळते रूप यामुळे या धबधब्याचे सौंदर्य जवळून पाहण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र राज्यांतील पर्यटक येथे दाखल होतात. या ठिकाणी संरक्षणासाठी कठडे करण्यात आले असले तरी या धबधब्याचा आनंद घेताना विशेष काळजी बाळगणे गरजेचे आहे.
धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही
जिल्ह्यातील हे तिन्ही धबधबे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, या ठिकाणी पर्यटकांच्या संरक्षणासाठी कुठल्याही उपाययोजना नाही. वनविभागाच्या हद्दीत हा भाग येत असल्याने येथे वन विभागामार्फत आवश्यक ती खबरदारी बाळगणे व सुरक्षिततेसाठी संरक्षण कठडे असणे अपेक्षित आहे. या धबधब्याची माहिती देणाऱ्या फलकांसह या ठिकाणी असलेला धोका याचाही माहितीदर्शक फलक लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासह प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय सुविधा असणे गरजेचे आहे.