धडगाव : निसर्गपूजक आदिवासी समुदायात होळी सणाला मोठे महत्त्व असून काठी ता़ अक्कलकुवा येथे पारंपरिक पद्धतीने शेकडो वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या राजवाडी होळीची तयारी यंदाही वेगात सुरु आहे़ होळीसाठी लागणारा बांबू शोधून होळीचे मानकरी मार्गस्थ झाले असून मजल दर मजल करत ते बुधवारी सायंकाळी काठीच्या सिमेवार पोहोचणार आहेत़सातपुड्यात काठी संस्थानची राजवाडी होळी आदिवासींसाठी पर्वणी असते़ यंंदाही होळीनिमित्त विविध तयारींना वेग आला असून यात प्रामुख्याने होळीसाठी लागणारा सर्वाधिक उंच बांबू आणण्याची कामगिरी होळीच्या मानकरींना सोपवण्यात आली होती़ यानुसार गावातील रायसिंग हांद्या वसावे, सेमट्या टेड्या वसावे, मांगा देहाल्या राऊत, बाहद्या किर्ता तडवी, नोवजा ईरमा वसावे, रामा बाहद्या पाडवी आणि रविंद्र पेचरा वसावे हे होळीचा उंच बांबू शोधण्यासाठी सातपुड्यात गुजरात हद्दीतील डेडियापाडा जि़ नर्मदा येथील जंगलाकडे रवाना झाले होते़ येथील बागवा, पानकुबा, नामगीर आणि हाकडी या जंगलात शोध घेत त्यांनी सर्वाधिक उंच बांबू मुळासकट काढला होता़ हा बांबू घेत ते चापडी, मोकस, पिंपळखुटा, बारीसुरगस, सुरगस, बिजरीगव्हाण, सोराचापडा, लिंबीपाडा ता़ अक्कलकुवा या मार्गाने काठीकडे रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ रस्त्यात ठिकठिकाणी मुक्काम करत हे होळीचे मानकरी बुधवार, २० मार्च रोजी काठी गावाच्या सिमेजवळ पोहोचणार आहेत़ याठिकाणी पारंपरिक पद्धतीने पूजन केल्यानंतर गावातील वडाच्या झाडाजवळ बांबू ठेवला जाऊन पहाटे उशिरा हा बांबू होळीच्या ठिकाणी आणला जाईल़
काठीच्या पारंपरिक राजवाडी होळीच्या तयारीला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:50 AM