जिल्ह्यातील व्यवहाराचा गाडा आला रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:18 PM2020-07-02T12:18:51+5:302020-07-02T12:18:59+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनलॉकडाऊन एक सुरू झाल्यापासून अर्थात १ जून पासून जिल्ह्यातील अर्थव्यवस्था आणि ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनलॉकडाऊन एक सुरू झाल्यापासून अर्थात १ जून पासून जिल्ह्यातील अर्थव्यवस्था आणि एकुणच बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्यास सुरुवात झाली. सद्य स्थितीत व्यवहाराची गाडी रुळावर आली आहे. जिल्ह्यात औद्योगिकरण नसल्यामुळे परत आलेल्या मजुरांना स्थानिक ठिकाणीच रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याने मोठी मदत झाली.
नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच आटोक्यात होता. त्यामुळे जिल्हा कधीही रेडझोनमध्ये गेला नाही. असे असले तरी कोरोना आटोक्यात राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. परिणामी जिल्हा आॅरेंज झोनमध्येच राहिला. त्याचा फायदा १ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉकडाऊन १ मध्ये जिल्ह्याला चांगला फायदा झाला. अनेक बाबींना सवलती मिळाल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्यास, बेरोजगारांना काम मिळण्यात झाले. महिनाभरात वेळोवेळी अनेक बाबींना सवलती मिळत गेल्याने आता जिल्ह्यातील व्यवहार ८० टक्के सर्वसामान्य झाले आहेत.
परराज्यात रोजागारासाठी गेलेले जवळपास ४८ हजार पेक्षा अधीक मजूर लॉकडाऊनच्या काळात परत आले. या मजुरांना परत आल्यावर स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नियोजन करून ठेवले. रोहयोवरील मजुरांची संख्या तब्बल ६२ हजारापर्यंत गेली होती. नाशिक विभागात हा उच्चांक होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीमुळे मजुरांचे फारशी अडचण आली नाही.
सद्य स्थितीत बाजारपेठेची वेळ ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेची आहे. जिल्हाअंतर्गत एस.टी.वाहतूक सेवा मर्यादीत स्वरूपात सुरू झाली आहे. ग्रामिण भागात अद्यापही एस.टी.सेवा सुरू झाली नाही. ती सुरू झाल्यास आणखी फरक पडणार आहे. लहान, मोठे उद्योग देखील जिल्ह्यात सुरू आहेत. त्यात नंदुरबारातील मिरची प्रक्रिया उद्योग, नवापुरातील दाळ प्रक्रिया उद्योग, एमआयडीसीतील उद्योग सुरू आहेत. जिल्ह्यातील सहाही बाजार समितींमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री सुरू आहे. शहादा व नंदुरबारातील कापूस खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांचा उर्वरित सर्व कापूस खरेदी केला जात आहे. शाळा, महाविद्यालये, आंतरजिल्हा एस.टी.वाहतूक तसेच सिनेमागृहे आणि उद्याने सुरू झाल्यास आणखी फरक पडणार आहे. परंतु ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊनच्या कालावधी वाढविण्यात आल्याने या सेवा महिनाभर बंदच राहतील.
एकुणच जिल्ह्यातील व्यवहार ७५ ते ८० टक्के व्यवहार सुरळीत झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मर्यादीत राहिला तर येत्या काळात जिल्ह्यातील संपुर्ण व्यवहाराचा गाडा रुळावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.