शहादा पालिका मुख्याधिकाऱ्यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:52+5:302021-09-14T04:35:52+5:30
पालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी सुधीर गवळी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर त्यांच्या जागी तीन वर्षांपूर्वी राहुल वाघ यांनी पालिकेच्या ...
पालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी सुधीर गवळी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर त्यांच्या जागी तीन वर्षांपूर्वी राहुल वाघ यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कारभार सांभाळला. यापूर्वी शहादा नगरपालिका व मुख्याधिकारी हा नेहमीच वादाचा मुद्दा होता. पदाधिकाऱ्यांशी होणाऱ्या वादामुळे राहुल वाघ यांच्यापूर्वी एकही मुख्याधिकारी गेल्या अनेक वर्षांत आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. हा शहादा पालिकेचा इतिहास आहे. राहुल वाघ यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांची समन्वय साधत विविध विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेत कारभार सुरू केला. त्यातच पालिकेत कामासाठी अथवा तक्रार करण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य माणसाची तत्काळ भेट घेऊन त्याचे शंका निरसन करणे, कोरोना काळात शहरात पहिला रुग्ण सापडल्यानंतर शहर कोरोनामुक्त होण्यापर्यंत त्यांनी केलेले प्रयत्न, यासोबतच गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची विकासकामे या त्यांच्या जमेची बाजू असली तरी त्यांची बदली होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात पालिकेतील दोघा नगरसेवकांनी पालिकेतील मनमानी कारभार व अनियमितता याबाबत केलेले उपोषण हे सदैव शहादेकरांच्या स्मरणात राहील.
अशा परिस्थितीत अहमदनगर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त दिनेश सिनारे यांनी शहादा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. सिनारे यांनी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी पालिकेतील कार्यालय पर्यवेक्षक माधव गाजरे, पाणीपुरवठा अभियंता संदीप चौधरी, संगणक अभियंता मंगेश गायकवाड, नगरअभियंता संदीप टेंभेकर या चार प्रमुख अधिकाऱ्यांची बदली झाल्याने ही पदे सध्या रिक्त आहेत. तर पालिकेचे लेखापाल पद अतिरिक्त कारभारावर कामकाज करीत आहे. एकूणच महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने यापुढील कामकाज करताना निश्चितच, अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. डिसेंबर २०२१ ला पालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने या तीन महिन्यांच्या कार्यकाळात शहरात पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण, अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा, यासोबतच नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्नांवर काम करण्यासाठी सिनारे यांना पालिकेतील सत्ताधारी व विरोधक या दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. सिनारे हे प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन मुख्याधिकारी गट ‘ब ’ प्रवर्गातील आहेत. त्यांची शहादा पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून बदलीचे आदेश करताना शासनाने परिविक्षाधीन मुख्याधिकाऱ्यांच्या ऑन फिल्ड ट्रेनिंग स्वरूपातील प्रशिक्षण व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून शहादा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदलीचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत मुख्याधिकारी सिनारे यांना पालिकेचे कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.