नंदुरबार : एकाच कामाचे दोनदा बील काढणे पालिकेत शक्यच नाही. मुख्याधिकारी, संबधीत अकाऊंटंट यांची बिलांवर सही असते. जर असा प्रकार खरच झाला असेल तर विरोधकांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्यास शासनाला भाग पाडावे. केवळ पोकळ आरोप करून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा शहर विकासाच्या कामांना मदत करून नागरिकांचे प्रश्न सोडवावे असा टोला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चेन्नई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेत विरोधकांना लगावला.भाजपतर्फे दोन दिवसांपूर्वी एकाच कामाचे दोनवेळा बील काढून पालिकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. या आरोपाचा आणि मागणीचा समाचार घेत आमदार रघुवंशी म्हणाले, पालिका म्हणजे कुणाची खाजगी कंपनी नाही, कुणीही यावे आणि आपल्या मनाप्रमाणे व्यवहार करावा. येथे शासनाची नजर असते. गैरव्यवहार, गैरकारभार दिसला तर थेट फौजदारी गुन्हे दाखल होतात. निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जाते. दोनदा बीलं काढले गेले असतील तर बिलांवर ज्यांची सही असते ते मुख्याधिकारी व संबधीत अकाऊंटंट अडकतात. पहिले त्यांच्यावर फौजदार गुन्हा दाखल होईल एवढे साधे लॉजीक विरोधकांना समजत नसेल तर त्यांची किव करावीशी वाटते. अडीच वर्ष अमळनेर पालिका सांभाळणा:यांना कायदे, नियम माहिती नसतील तर त्यांच्या हातात पालिका आली असती तर काय झाले असते याचा विचार जनतेने करावा. वारंवार तेच आरोप करून जनतेची दिशाभूल चालविली आहे. जनतेने नाकारलेले लोकं चर्चेत राहण्यासाठी दर महिना, दोन महिन्यांनी रघुवंशी परिवारावर असे आरोप करून आपली प्रतिमा मलीन करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला. आपल्याला झालेल्या आजाराच्या दु:खापेक्षा असे बोगस आणि खोटे आरोप केले जातात त्याचे जास्त दु:ख असल्याचेही भावनिक उद्गार त्यांनी काढले.शहरात पालिकेव्यतिरिक्त जनतेचे अनेक प्रश्न आहेत. उड्डाणपुलाचा खर्चाचा इंधनावरील सेसचा प्रश्न आहे. नळवा रस्त्यावरील बोगद्यासाठी आपण एक कोटी रुपये मंजुर करून आणले. परंतु हे काम बंद आहे. शहरालगतच्या वसाहतींमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे असे एक ना अनेक प्रश्न असतांना ते सोडविण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदार, आमदारांकडे व सरकारकडे पाठपुरावा करून 2022 च्या पालिका निवडणुकांची तयारी विरोधकांनी करावी असा टोलाही त्यांनी लगावला.तंबाखुमुक्त जिल्ह्याप्रमाणे लवकरच आपण दारूमुक्त नंदनगरी करण्यासाठी मोहिम सुरू करणार आहोत. दारूमुळे शहराचे नाव बदनाम होत आहे. त्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग घेणार असल्याचेही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी सांगितले.
जनतेची दिशाभूल करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न : आमदार रघुवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:56 PM