लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अन्य राज्यात न्यायालयांच्या कार्यक्रमात मातृभाषेचा मुख्यत्वे वापर केला जातो, परंतु राज्यात मात्र मराठीऐवजी इंग्रजीचा वापर होत असल्याची खंत उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी येथील कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली.माजी आमदार बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न्या.दिलीप भोसले यांच्या हस्ते शनिवारी जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार सुधीर तांबे, आमदार काशिराम पावरा, आमदार डी.एस.अहिरे, आमदार सुनील गामित, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, धुळ्याचे शिवाजी दहिते, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, अॅड.पद्माकर वळवी आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना न्या.दिलीप भोसले म्हणाले, न्यायालयीन क्षेत्रात काम करतांना महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काम करण्याची संधी मिळाली. गेल्या 30 वर्षाच्या काळात अनेक अनुभव आले. इतर राज्यात भलेही न्यायालयीन कामकाज इंग्रजी भाषेतून होत असेल परंतु न्यायालयाचे सार्वजनिक कार्यक्रम राहिल्यास तेथे मातृभाषेचाच वापर होतो. सर्वच भाषणे आणि विचार मातृभाषेतून व्यक्त केले जातात. याउलट परिस्थिती राज्याची आहे. मातृभाषेला येथे दुय्यम स्थान दिले जाते, त्याऐवजी इंग्रजीचाच सर्वाधिक वापर केला जातो. बटेसिंह रघुवंशी यांचा पुर्णाकृती पुतळा नेहमीच दिपस्तंभासारखी सर्वाना प्रेरण देत राहील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन त्यातून ग्रामिण आणि मागास भागाचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाजकार्य करतांना पद, सत्ता याचा विचार न करता आदी काम करावे व नंतर त्यातून पदांसाठी जागा निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.पालकमंत्री जयकुमार रावल, बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड.राजेंद्र रघुवंशी यांनी केले तर आभार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केले.
न्यायालयीन कार्यक्रमात मातृभाषेचा वापर व्हावा : उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती भोसले यांचे नंदुरबारात प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 3:22 PM