तळोदा : शहरातील अण्णा गणेश मंडळाने गणेशोत्सवात कोरोना लसीकरण शिबिर घेत कोरोनाबाबत जनजागृती केली. लसीकरण शिबिरात एकूण १४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे गणेश मंडळाने कोरोनाच्या या काळात लसीकरण मोहीम राबवून आदर्श निर्माण केला आहे. या मंडळाचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.
खान्देशी गल्लीतील अण्णा गणेश मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो. यंदा गरजू व निराधार नागरिकांना अन्नदान वाटप तसेच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप कार्यक्रम घेतले. सोमवारी कोरोना लसीकरण शिबिर घेतल्याने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात १४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शिबिरात आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. विशाल चौधरी यांनी भेट देऊन नागरिक व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. लसीकरणासाठी डॉ.तुषार पटेल, देवेंद्र राठोड, मनिषा गावीत, परिचारिका एल.डी. साळवे, वैष्णवी चितोड यांनी सहकार्य केले. मंडळाचे अध्यक्ष बालू राणे, उपाध्यक्ष अतुल सूर्यवंशी, सचिव अरुण कर्णकार, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन कर्णकार, सुनील कर्णकार, जगन्नाथ कर्णकार, हिरालाल कर्णकार, संतोष माळी, रोशन पिंपरे, निरल राणे, दिनेश सूर्यवंशी, रोहित सूर्यवंशी, कल्पेश चव्हाण मुकुंदा महाजन, कुलदीप वाघ, योगेश कर्णकार, कपिल कर्णकार, सुमित लोखंडे, भरत कर्णकार, किरण कर्णकार आदींनी परिश्रम घेतले.