Vidhan Sabha 2019: नंदुरबार जिल्ह्यात 52 लाखांची दारू तर 16 लाख रुपये रोख जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:58 PM2019-10-15T12:58:56+5:302019-10-15T12:59:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आतार्पयत जवळपास 16 लाखांची रोख रक्कम आणि 52 लाख 10 ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आतार्पयत जवळपास 16 लाखांची रोख रक्कम आणि 52 लाख 10 हजारांची देशी, विदेशी दारू जिल्ह्यात आतार्पयत जप्त करण्यात आली आहे. याशिवाय एक देशी कट्टे आणि एक तलवार देखील जप्त करण्यात आली आहे. अवैध दारू, रोख रक्कमेची हताळणी याकडे निवडणूक विभागाचे लक्ष आहे. यासाठी वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली आहे.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, पैशांचा अपव्यय आणि हेराफेरी टाळावी यासाठी निवडणूक आयोगाने विशेष दक्षता घेतली आहे. यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क यांची पथके देखील ठिकठिकाणी कारवाई करीत आहेत.
52 लाखांची दारू
निवडणूक जाहीर झाल्यापासून आतार्पयत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून तब्बल 52 लाख 10 हजारांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी 21 लाख 81 हजार 779 रुपयांची तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख 28 हजार 559 रुपयांची दारू जप्त केली आहे. ठिकठिकाणी गुन्हे दाखल करून संबधीतांना ताब्यातही घेण्यात आले आहे. याशिवाय एक बिअरबार सील केले आहे.
रोख रक्कमेकडे लक्ष
निवडणूक आयोगाने रोख रक्कमेच्या हाताळणीकडे देखील लक्ष ठेवले आहे. बँकांनाही एक लाखापेक्षा अधीकचे व्यवहार झाल्यास माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतार्पयत पथकांनी जिल्ह्यात 16 लाख 70 हजारार्पयत रोख रक्कम जप्त केली आहे. दोन्हीही रोख रक्कमा या नंदुरबार तालुक्यातील कारवाईतच जप्त झालेल्या आहेत. मतदानाची तारीख जशी जवळ येईल तशी रोख रक्कमेवर निवडणूक आयोग आणि पथक लक्ष ठेवून राहणार आहे.
घातक शस्त्रेही जप्त
ठिकठिकाणी करण्यात आलेली नाकाबंदी, पोलिसांचे गस्ती पथक या माध्यमातून आतार्पयत जिल्ह्यात एक गावठी पिस्तूल आणि एक तलवार असे घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. येत्या काळात अवैध शस्त्रांच्या हाताळणीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाचे पथक किंवा पोलीसांना अद्याप जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतूक किंवा साठा सापडलेला नाही. ठिकठिकाणी असलेल्या तपासणी नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. सध्या अशा ठिकाणी वाढीव पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.
2019
च्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात एकूण 300 पेक्षा अधीक केसेस करण्यात आल्या आहेत. याशिवाय रोख रक्कमेच्या दोन केसेस करण्यात आल्या आहेत. शस्त्रबंदीच्या केसेस देखील दाखल झालेल्या आहेत. येत्या काळात कारवाईला अधीक जोर दिला जाणार आहे.
जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर असल्यामुळे दोन्ही राज्यांच्या सिमेवर एकुण 16 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.