नंदुरबार : चौथ्या टप्प्यात मतदान असलेल्या नंदुरबार मतदारसंघासाठी आणखी काही दिवस उमेदवार जाहीर होण्याची वाट पहावी लागणार असल्याचे चिन्हे आहेत. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी दोन जण इच्छूक आहेत. भाजममध्ये आपण एकटीनेच उमेदवारीची मागणी केली असल्याचे यापूर्वीच खासदार डॉ.हिना गावीत यांनी स्पष्ट केले आहे.नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात अर्थात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेला अजून वेळ असल्यामुळे राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करण्यासंदर्भात फारशा हालचाली करीत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी आमदार अॅड.के.सी.पाडवी व जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावीत यांनी उमेदवारीची पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली आहे. भरत गावीत यांच्या उमेदवारीसाठी माजी खासदार माणिकराव गावीत हे दिल्ली येथे थांबले आहेत. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत उमेदवारीसाठी काही प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे.दुसरीकडे भाजपतर्फे खासदार डॉ.हिना गावीत यांनीच उमेदवारीची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाकडे केवळ आपणच उमेदवारीची मागणी केली असून त्यादृष्टीने प्रचाराला देखील सुरुवात केली असल्याचे स्पष्ट केले आहे. बहुजन वंचीत आघाडीतर्फे उमेदवार जाहीर झाला आहे. आदिवासी महासंघ देखील उमेदवार देण्याबाबत हालचाली करीत आहेत. काही अपक्ष देखील उमेदवारीसाठी तयारीत आहेत.
उमेदवारी जाहीर होण्याकडे मतदारांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:55 AM