मतदानातील चढ-उतार कुणाच्या पथ्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:45 PM2019-10-23T12:45:46+5:302019-10-23T12:45:52+5:30

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात नंदुरबार वगळता इतर तिन्ही विधानसभा मतदार संघात मतदारांनी ...

Voting fluctuations on whose path! | मतदानातील चढ-उतार कुणाच्या पथ्यावर !

मतदानातील चढ-उतार कुणाच्या पथ्यावर !

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात नंदुरबार वगळता इतर तिन्ही विधानसभा मतदार संघात मतदारांनी मतदानाचा उत्साह दाखविला आहे. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा झालेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडेल याबाबत आता लोकांमध्ये उत्सुकता लागली असून, जो तो आपले नवी समीकरणे मांडत जय-पराजयाची बेरीज-वजाबाकी करीत आहेत. त्यामुळे सध्या चौका-चौकात याच गप्पांना ऊत आला असून, सर्वाचेच लक्ष निकालाकडे लागले आहे. 
जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर, शहादा व अक्कलकुवा या चारही विधानसभा मतदार संघामध्ये सोमवारी मतदान झाले. ही निवडणूक राजकारणाच्या दृष्टीने नवे समिकरण मांडणारी निवडणूक ठरली. कारण निवडणुकीच्या टप्प्यावरच जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्ष बदल केल्यामुळे काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये आले तर भाजपचे नेते काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे राजकारणातील ही उलथापालथ मतदारांनाही शेवटच्या क्षणार्पयत संभ्रमीत करीत राहिली. याच संभ्रमीत अवस्थेत या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यामुळे जय-पराजयाचा अंदाज बांधणेही सर्वासाठी काहीसा तसाच अवघड ठरत आहे. विशेषत: या निवडणुकीत सर्वच ठिकाणी कुठेही स्थानिक प्रश्नांवर चर्चा होताना दिसून आली नाही. विकासाचा प्रभावी अजेंडा कुणीही मांडला नाही. केवळ औपचारिक घोषणा, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप यातच निवडणूक रंगली. त्यामुळे मतदारांमध्येही काही ठिकाणी उत्साह तर काही ठिकाणी निरुत्साह दिसून आला. शहरी भागात फारसा उत्साह नव्हता. नंदुरबार, शहादा येथे खूपच कमी मतदान झाले.
चार विधानसभा क्षेत्रापैकी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नंदुरबार विधानसभा मतदार संघात सर्वात कमी म्हणजे 55.28 टक्के मतदान झाले आहे. जे 1985 नंतर सर्वात कमी आहे. 1985 ला निवडणुकीत फारशी चुरस नव्हती. त्यावेळचे विजयी उमेदवार इंद्रसिंग वसावे हे 49.28 टक्के अधिक मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर प्रथमच या वेळीदेखील सर्वात कमी म्हणजे 55.28 टक्के मतदान झाले आहे. याबाबत राजकीय गोटात वेगवेगळ्या चर्चा चर्चील्या जात आहेत. 1985 प्रमाणेच निवडणुकीत चुरस नसल्याने मतदान कमी झाल्याचे बोलले जात आहे. तर काही ठिकाणी चंद्रकांत रघुवंशी व डॉ.विजयकुमार गावीत गट एकत्र आल्याने मतदारांमध्ये उत्साह नसल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघात भाजपाचे डॉ.गावीत विरूद्ध काँग्रेसचे उदेसिंग पाडवी अशी लढत झाली.
जिल्ह्यात सर्वाधिक मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघात झाले. या ठिकाणी गेल्या चार दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात एकत्र काम करणारे नेते माणिकराव गावीत व सुरूपसिंग नाईक या दोन्ही नेत्यांचे वारसदार भरत गावीत व शिरीष नाईक हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात माजी आमदार शरद गावीत यांनीही निवडणुकीत चुरस निर्माण केली. त्यामुळे मतदानाची टक्केवारी येथे वाढल्याचे सांगितले जाते. गेल्या 2014 मध्ये देखील याठिकाणी 74.18 टक्के मतदान झाले   होते. आता मात्र त्यापेक्षा अधिक म्हणजे 75.37 टक्के मतदान झाले आहे. त्यापेक्षा अधिक 2009 मध्ये या ठिकाणी मतदान झाले होते. त्या वेळी 76.06 टक्के मतदान झाले होते.    तेव्हा मात्र या मतदार संघात सुरूपसिंग नाईक यांचा प्रथमच पराभव झाला होता. आतादेखील मताधिक्य गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का अधिक झाले असल्याने हे वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
शहादा मतदार संघातदेखील या वेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत किंचीत 0.16 टक्के मतदान वाढले आहे. येथे 2014 मध्ये 65.16 टक्के मतदान झाले होते. त्या वेळी येथे तिरंगी लढत होती. या वेळी मात्र येथे 65.31 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार पद्माकर वळवी या वेळीदेखील काँग्रेसतर्फे उमेदवारी करीत होते. तर भाजपतर्फे राजेश पाडवी यांच्या रुपाने नवीन उमेदवार देण्यात आला. गेल्या वेळी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविणारे राजेंद्र गावीत यांनी भाजपात प्रवेश केल्याने ते भाजप सोबत होते. याच ठिकाणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  
अक्कलकुवा मतदार संघातही तिरंगी लढतीमुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी काँग्रेसचे के.सी. पाडवी व शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि भाजपचे बंडखोर नागेश पाडवी यांच्यात चुरशीची लढत झाली. चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यांनतर त्यांनी आपल्या कार्यकत्र्यासह अक्कलकुव्यात डेरा दाखल केला होता. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली. त्याचाच परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला आहे.
 

Web Title: Voting fluctuations on whose path!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.