आंबे घेण्यासाठी लांबलचक रांगा लावूनही खाली हात परतावे लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:05 PM2020-04-27T14:05:23+5:302020-04-27T14:05:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाची दहशत, महिनाभरापासूचे लॉकडाऊन यावर मात करीत जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा अमाप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाची दहशत, महिनाभरापासूचे लॉकडाऊन यावर मात करीत जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा अमाप उत्साह दिसून आला. संचारबंदीच्या काळात दिलेल्या शिथीलतेच्या काळात बाजारात खरेदीतून मोठी उलाढाल देखील झाली. आंबा आवक कमी असल्याने खरेदीसाठी फळांच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रांगेत उभे राहूनही अनेकांना खाली हात परतावे लागले.
परंतु साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला खरेदी करण्यात येणाऱ्या चैनिच्या वस्तू, वाहन, स्थावर मालमत्ता आणि नवीन कामांचे शुभारंभ मात्र होऊ शकले नाहीत.
कोरोनाने सर्वांची झोप उडविली आहे. शहरापासून गाव, पाड्यापर्यंतचे नागरिक कमालीचे दहशतीत आहेत. हा आजार आपल्या गावाच्या आणि वसाहतीच्या वेशीपर्यंत येवू नये यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. या काळजीतूनच गेल्या महिनाभरात आलेले सण, उत्सव साजरे करण्याबाबत फारसी उत्सूकता न दाखविणाºया नागरिकांनी मात्र अक्षय तृतीयेला उत्साह दाखविला.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणासाठी आणि पुर्वजांचे नामस्मरणासाठी नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली. पुरणपोळी आणि आंब्याचे नवैद्य दाखवून पुर्वजांचे स्मरण केले जाते.
यंदा मात्र लॉकडाऊनमुळे आंबेच बाजारात नसल्याने मोठी पंचायत झाली. सकाळी साडेसहा पासूनच फळांच्या दुकानासमोर आंबे खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. नागरिकांना अक्षरश: मूहमांगा दाम द्यावा लागत होता. तरीही सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील सर्व विक्रेत्यांकडील आंबे संपल्याचे चित्र होते. अनेकांना आंबे भेटले नसल्याने त्यांनी हवाबंद आंब्याच्या रसाचा डबा घरी नेणे पसंत केले. त्याच्याही किंमती वाढविण्यात आल्याचे दिसून आले.