सातपुड्यातील बेघरांचे स्वप्न कधी पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:02 PM2020-07-07T12:02:33+5:302020-07-07T12:02:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र सातपुड्यातील अतिदुर्गम भागात भेट दिल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कोसोदूर असल्याचे दिसून येते. येथील अनेक कुटूंब अद्यापही गवताच्या छताखाली वास्तव्य करीत आहे. त्यांच्या पक्क्या घराचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न कायम आहे.
सातपुड्यातील एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे तोरणमाळकडील आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस गुजरात राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल व उंच उंच पहाड, खोल दऱ्यांनी या परिसराला व्यापले आहे.
सहा ते सात किमीचा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते. काही स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून वन संपत्ती गोळा करण्यासाठी वन वन भटकणारा आदिवासी समाजाचा घनदाट जंगलात व नदी खोºयात टोळीचा वावर असायचा. कदाचित बन उपज गोळा करून आपल्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी आदिवासी लोकांची टोळी या भागात गेली असावी.
हा भूभाग इतर लोकवस्तीपासून दूर असल्याने त्यांना सूर्यास्तापूर्वी परत जाणे शक्य न झाल्यामुळे त्या लोकांच्या टोळीने येथील मोकळ्या भूभागावर आपला डेरा स्थापन केला असावा. कालांतराने येथे या टोळीतील कुटूंब विस्तारले आणि वस्ती निर्माण झाली. आधी काळापासून ज्या मूलभूत गरजासाठी लोकांना वन वन भटकावे लागत होते. येथील पाचही गावांमध्ये एकही पक्के घर दिसून आले नाही. येथील बहुतेक घरे मातीची व कौलारू छताची आहेत. त्यातच ४० टक्के घरे फक्त बांबू आणि गवताच्या छताचे तसेच बांबूच्या भिंती असलेले दिसून येतात. या गावामध्ये अनेक कुटुंबाना साधे कौलारू घरे सुध्दा नशीबी नाही तर मग पक्के घर कधी हा मोठा प्रश्न निर्माण होता आहे. मागील ४० वर्षांपासून केंद्र शासनाची केंद्र शासनाची आवास योजना सुरू असून, सुध्दा एवढ्या वर्षात येथील एकाही कुटूंबाला घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. ही घरकुल योजना गावांपर्यंत अद्यापपर्यंत पोहोचली नसल्याचे दिसून येत आहे.