नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील गैरप्रकारांना आळा कधी बसेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:22 AM2021-07-18T04:22:25+5:302021-07-18T04:22:25+5:30
नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील पीयूसीच्या नावाखाली वाहनचालकांकडून अवाजवी वसुली करणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या सांगण्यावरून जास्तीचे पैसे ...
नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील पीयूसीच्या नावाखाली वाहनचालकांकडून अवाजवी वसुली करणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या सांगण्यावरून जास्तीचे पैसे घेऊन कमी वजनाची पावती देणे, सुरक्षारक्षक (खासगी पंटर) काही वाहनचालकांशी मिलीभागत करून टॅक्स न भरता परस्पर आर्थिक व्यवहार करून वाहनांना सोडतात. यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. या सर्व प्रकाराला सीमा तपासणी नाक्यावरील संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्या मूक संमतीशिवाय एवढा मोठा गैरप्रकार होऊ शकत नाही, असा आरोप मधुकर नाईक यांनी केला आहे.
नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील गैरप्रकार तत्काळ थांबवावा. पीयूसीच्या नावाखाली वाहनचालकांकडून जास्तीचे पैसे घेणे, वजनकाट्यावर जास्तीचे पैसे घेऊन मापात पाप करणे व वाहनांकडून टॅक्स वसूल न करता सोडून देणे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, परिवहनमंत्री यांच्याकडे वारंवार करण्यात आली आहे. परंतु याबाबत अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे संबंधित विभागप्रमुख व परिवहनमंत्री संशयाच्या घेऱ्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सरचिटणीस मधुकर नाईक यांनी केला आहे.
वजनकाट्यात घोळ असल्याने येथील कंपनीला अनेक वेळा नोटीस दिल्या आहेत. याबाबत चौकशी झाली पाहिजे. नाक्यावर असलेल्या सुरक्षारक्षक यांच्या सांगण्यावरून टॅक्स चुकविण्यासाठी उच्छलमार्गे गांधीनगर गावातून वाहने मार्गस्थ होतात. तर नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून टॅक्स न घेता अवैध पैशांची मागणी करतात. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. अवैधरीत्या होणाऱ्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. परिवहन विभागाचे काही अधिकारी गैरप्रकारांना खतपाणी घालतात, असा आरोप मधुकर नाईक यांनी केला आहे.