नंदुरबार येथे महिला बचतगटांसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:49+5:302021-09-15T04:35:49+5:30
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आयोजित स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांसाठी महिला बचतगटांसाठी उपजीविकेच्या संधी व बँक लिंकेज ...
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आयोजित स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांसाठी महिला बचतगटांसाठी उपजीविकेच्या संधी व बँक लिंकेज विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा येथे आयोजित करण्यात आली. याप्रसंगी पाणी फाऊंडेशनचे नंदुरबार समन्वयक भूषण ठाकरे, मशरूम उत्पादक घनःश्याम पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविकात नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील यांनी हिंदी दिवसाचे औचित्य साधून सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी नाबार्डने बचत गटांसाठी राबविलेल्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. तसेच बचत गटांसाठी उद्यमितेचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी जिल्हाभरातील बचतगट बँक लिंकेजची सद्य:स्थिती व प्रभावी बचतगट चळवळीसाठी स्वयंसेवी संस्थांची विकासात्मक भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र दहातोंडे यांनी सांगितले की, कुठेही उद्योगाला एक हजार दिवस जगवा म्हणजे तो पुढील पिढ्यान्-पिढ्या टिकेल. त्याला यंत्रणा आणि मनुष्यबळाचीदेखील आवश्यकता आहे. कडधान्य प्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया यासाठी पारंपरिक पद्धती, आधुनिक साठवणूक पद्धती, धान्य सुरक्षितता यावर ग्रामीण भागात भर देण्यात येत आहे. बचतगटांसाठी जिल्ह्यात संभाव्य उपक्रमांबद्दल माहिती दिली.
भूषण ठाकरे यांनी पाणी फाऊंडेशनद्वारे राबविल्या जाणाऱ्या समृद्ध गाव स्पर्धा व गावपातळीवर जल/मृदा संधारणात स्वयंसेवी संस्थांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी या उपाययोजनांचा नाबार्ड अर्थसहायित पाणलोट व इतर विकासात्मक परियोजनांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी प्रभावी वापर करावा, असे आवाहन केले. घनश्याम पाटील यांनी काहटूळ गावात उभारलेल्या ऑईस्टर मशरूम या जिल्ह्यातील नवीनतम प्रकल्पाबद्दल माहिती दिली. त्यांनी मशरूम व्यवसायातील बचत गटांसाठी उपजीविकेच्या संधी व क्षमता उभारणीमध्ये स्वयंसेवी संस्थांचे अपेक्षित कार्य या विषयावर संवाद साधला. डीएसए संस्थेच्या सोनाली सोनवणे यांनी घरगुती परसबागेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमासाठी डॉ. हेडगेवार सेवा समिती, डेव्हलपमेंट सपोर्ट सेन्टर, लुपिन फाऊंडेशन, माविम, बायफ, रूरल फाऊंडेशन, गायत्री फाउंडेशनचे बी. के. पाटील, नाबार्डचे कर्ज विभागप्रमुख उमेश बडगुजर, गुणवंत पाटील व इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन ललित राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरच्या सहयोगाने करण्यात आले.