नंदुरबार: आक्षेपार्ह व तेढ निर्माण होईल, असे स्टेटस् ठेवल्याप्रकरणी नंदुरबारातील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.
नंदुरबारातील एका युवकाने आक्षेपार्ह स्टेटस् त्याच्या व्हॉटस्अपवर ठेवल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली. नंदुरबार शहरातील भोणे फाटा भागातील एका तरुणाने हा प्रकार केल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, त्यांनी लागलीच पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक पाठवून संबंधित तरुणास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह, सार्वजनिक शांतता भंग करणारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ, पोस्ट प्रसारित करू नये, स्टेटस् ठेवू नये तसेच कोणीही कायदा हातात घेऊन सार्वजनिक शांतता भंग करू नये, तसे आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील. असा प्रकार आढळल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधवा. - पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार.