नाशिक विभागात बारावीचे १ लाख ६८ हजार परीक्षार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:26 AM2019-02-21T01:26:30+5:302019-02-21T01:26:48+5:30
महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेला गुरुवार, दि. २१ पासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ६८ हजार ३५८ परीक्षार्थी बसले आहेत. विभागातील २२८ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा होणार आहे.
नाशिक : महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेला गुरुवार, दि. २१ पासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ६८ हजार ३५८ परीक्षार्थी बसले आहेत. विभागातील २२८ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा होणार आहे.
बारावी परीक्षेसाठी मंडळाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे. पाच मिनिटे उशीर झाला तरी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना केंद्रांना देण्यात आली आहे. यंदा मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांनाच परीक्षा केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे कस्टोडीयनची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी विभागात एकूण ५९ परिरक्षक असून २२८ केंद्र संचालक आहेत. १०१६ कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत.
यंदा नऊ भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका तयार करण्यात आली होती. तर विज्ञान आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आलेला आहे.