शौचालय न वापरणे पडले महाग सरपंचांसह १२ सदस्य अपात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 03:03 AM2019-03-03T03:03:31+5:302019-03-03T03:03:36+5:30
बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील सरपंचासह तब्बल बारा ग्रामपंचायत सदस्यांना शौचालय वापराचे सबळ पुरावे सादर न करता आल्याने अपात्र ठरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय नाशिक विभागाचे अपर महसूल आयुक्त ज्योतीबा पाटील यांनी दिला आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील सरपंचासह तब्बल बारा ग्रामपंचायत सदस्यांना शौचालय वापराचे सबळ पुरावे सादर न करता आल्याने अपात्र ठरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय नाशिक विभागाचे अपर महसूल आयुक्त ज्योतीबा पाटील यांनी दिला आहे.
मालेगावचे अपर जिल्हाधिकारी एल. बी. राउत यांनी साडे तीन महिन्यांपूर्वी या १२ सदस्यांना शौचालय न वापरल्याने अपात्र घोषित केले होते. या निर्णयाविरोधात बाराही सदस्यांनी अपर आयुक्तांकडे अपील केले होते. त्यावर सुनावणी होऊन उपरोक्त निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपला चांगलीच चपराक बसली असून ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
सतरा सदस्य असलेल्या लखमापूर ग्रामपंचायतमधील तब्बल बारा सदस्य शौचालय प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने अपात्र ठरले आहेत. यामुळे आता कोरमचा अभाव असल्याने ग्रामपंचायत आता बरखास्त होण्याची शक्यता आहे.