पंचवटी : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व समिती आवारात गर्दीचा फायदा घेऊन भाजीपाला खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या खिशातून मोबाइल चोरणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ८७ हजार रुपये किमतीचे डझनभर मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल भिकन कासार (रा. मायको दवाखाना, दिंडोरी रोड) आणि दीपक बाळासाहेब उगले ( रा.भारतनगर, मुंबई नाका) या दोघांना अटक करण्यात आले आहे. पंचवटीतील दिंडोरीनाका, बाजारसमिती व पेठरोडवरील भाजी बाजारात दिवसभर भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून मोबाइलची चोऱ्या केल्या जातात. चार ते पाच दिवसांपूर्वी पेठरोडवरील आरटीओ ऑफिस मागे राहणारे राहुल कोते बाजारसमिती जवळ भाजीपाला खरेदी करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातून मोबाइल लांबविल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कोते यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा माग घेताना पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध विभागातील सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या पथकाने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करून संशयित राहुल किसन कासार याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र दीपक बाळासाहेब उगले याच्या मदतीने मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली, पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन ८७ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे १३ मोबाइलही जप्त केले आहेत. गुन्हे शोध पथकाचे बालनाथ ठाकरे, हवालदार शेखर फरताळे, विलास चारोस्कर, राकेश शिंदे, नितीन जगताप, गोरक्ष साबळे, श्रीकांत कर्पे, योगेश सस्कर, अविनाश थेटे आदींनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
100921\10nsk_28_10092021_13.jpg
दोघा चोरांकडून १३ मोबाईल जप्त