नाशिक : जिल्ह्यात साेमवारी (दि. ४) बाधितांच्या संख्येत १९० रुग्णांची भर पडली असून, १५८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर मृतांच्या संख्येत ५ने भर पडल्याने एकूण बळींची संख्या १,९८८ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ७२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ७ हजार ३०८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,७७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.१२, नाशिक ग्रामीण ९६.११, मालेगाव शहरात ९२.६७ तर जिल्हाबाह्य ९४.०७ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १,७७६ बाधित रुग्णांमध्ये १,११६ रुग्ण नाशिक शहरात, ४८५ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १६३ रुग्ण मालेगावमध्ये तर १२ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ४६ हजार ०८६ असून, त्यातील ३ लाख ३१ हजार ९०१ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ११ हजार ७२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
शिक्षक चाचण्यांनी वाढले प्रलंबितचे प्रमाण
जिल्ह्यात ४ जानेवारीपासून नववीपुढील वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि शालेय स्टाफच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्या प्रमाणात अहवाल येत नसल्याने, गत महिन्यात एक हजाराखाली असलेली प्रलंबित संख्या आता ३ हजार ११३ वर पोहोचली आहे.