ग्रामीण पेयजल योजनेतून नामपूरसाठी १६ कोटीचा निधी
By admin | Published: July 6, 2017 12:11 AM2017-07-06T00:11:40+5:302017-07-06T00:11:52+5:30
ग्रामीण पेयजल योजनेतून नामपूरसाठी १६ कोटीचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
नामपूर : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत नामपूर गावासाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे येथील पाणीप्रश्न निकाली निघण्यास हातभार लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
बागलाण तालुक्यातील नामपूर हे मोसम नदीकाठी वसलेले पंचक्रोशीतील प्रमुख बाजारपेठ म्हणुन विकसित होत असलेले गाव असून सदर गावास सटाणा, ताहाराबाद, मालेगाव, साक्री या गावाकडून येणारे रस्ते येऊन मिळतात. गेल्या काही वर्षात नामपूर गावाची वाढ झपाट्याने होत गेली परंतु गेल्या २५ ते ३० वर्षाच्या काळात गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला होता. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा व आरोग्याशी निगडीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यातून नामपूर गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत १६ कोटीचा भरीव निधी सन २०१७-१८ च्या आराखड्यात मंजूर झाला आहे. त्यातून येत्या एक ते दीड वर्षाच्या काळात कामकाज पूर्णत्वास येऊन नामपूरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यास मदत होणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.