नाशिक : शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी देण्यात येणाऱ्या पीक कर्ज वितरणात वाढ झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांना १८०२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये पीक कर्जाचे प्रमाण ६५ टक्के इतके आहे. दरम्यान, जिल्हा बँकेने एकूण उद्दिष्टापैकी ४६७ कोटींचे वाटप केले आहे.
शेतकऱ्यांना खरिपासाठी मदत व्हावी म्हणून शासनाकडून त्यांना पीक कर्ज दिले जाते. जुन्या कर्जाची परतफेड करून शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिले जाते. या कर्जासाठी शेतकऱ्यांची मागणीदेखील होते. जिल्हा सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पीक कर्ज दिले जात असून, त्यासाठी त्यांना उद्दिष्टही दिले जाते. जिल्ह्याला यंदा दोन हजार ७८० कोटींचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, यंदा मान्सूनला विलंब झाल्यामुळे पीक कर्ज मागणीदेखील फारशी झाली नव्हती. शिवाय कर्ज वितरणाची प्रक्रियादेखील संथ गतीने सुरू होती. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, तसेच त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बँकांचा आढावा घेत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या होत्या. जवळपास दीड महिन्याच्या विलंबाने मान्सूनचे आगमन झाल्यामुळे पीक कर्जाची मागणी वाढत गेली आणि कर्ज प्रक्रियेलादेखील गती आली.
सद्य:स्थितीत ९८ हजार शेतकऱ्यांना १८०२ कोटी कर्ज वाटप झाले असून, एकूण कर्ज वाटप उद्दिष्टाचे हे प्रमाण ६५ टक्के इतके आहे. गतवर्षी हेच प्रमाण अवघे ५७ टक्के इतके होते. जिल्ह्याला यंदा दोन हजार ७८० कोटींचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. राष्ट्रीयीकृत व त्या खालोखाल जिल्हा बँकेला उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दिष्टापैकी ४६७ कोटींचे वाटप केले आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी १ हजार १८३ कोटींचे वाटप केले आहे. खासगी व ग्रामीण बँकांचे उद्दिष्ट मात्र पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, गतवर्षी आजमितीला कर्ज वाटपाचे प्रमाण अवघे ५७ टक्के इतके होते. यंदा हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के अधिक आहे.
--इन्फो--
खरीप पीक कर्ज वाटप उद्दिष्ट - २ हजार ७८० कोटी
१) राष्ट्रीयीकृत बॅक
उद्दिष्ट - १ हजार ८७२ कोटी
वाटप - १ हजार १८३ कोटी
२) खासगी बॅक
उद्दिष्ट - ३६५ कोटी
वाटप - २७६ कोटी
३) ग्रामीण बँक
उद्दिष्ट - ८ कोटी
वाटप - ५.७० कोटी
४) जिल्हा बँक
उद्दिष्ट - ५३५ कोटी
वाटप - ४६७ कोटी