नमामि गोदेसाठी केंद्राकडून १८०० कोटींचे पॅकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 01:16 AM2021-08-11T01:16:29+5:302021-08-11T01:17:10+5:30
सात राज्यांना समृध्द करणाऱ्या दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासनाच्या 'नमामि गंगे'च्या धर्तीवर १८२३ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी तत्त्वत: मान्य केले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तातडीने हा निधी द्यावा यासाठी भाजपाच्या नेत्यांनी त्यांना साकडे घातले. यासंदर्भात महापालिकेने तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेशही शेखावत यांनी दिले आहेत, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
नाशिक - सात राज्यांना समृध्द करणाऱ्या दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासनाच्या 'नमामि गंगे'च्या धर्तीवर १८२३ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी तत्त्वत: मान्य केले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तातडीने हा निधी द्यावा यासाठी भाजपाच्या नेत्यांनी त्यांना साकडे घातले. यासंदर्भात महापालिकेने तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेशही शेखावत यांनी दिले आहेत, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
केंद्र शासनाने नाशिककरांंना दिलेली ही मोठी भेट असून त्यामुळे गोदावरी नदीचे नष्टचर्य संपण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रियाही महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून त्यामुळेच आता भाजपने लोकांना दिसतील अशाप्रकारची कामे करण्यावर, किमान जाहीर करण्यावर भर दिला आहे. गोदावरी नदीसाठी अशा प्रकारचा १८ काेटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी महापालिकेने २०२० मध्येच प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळावी यासाठी यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पूर्वीच पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपचे शिष्टमंडळच दिल्लीदरबारी गेले आहे. मंगळवारी त्यांनी जलमंत्री शेखावत यांची भेट घेतली.
महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे व संजय घुगे यांनी या प्रकल्पाचे जलमंत्र्यांसमोर सादरीकरण केले. तसेच नाशिक ही कुंभनगरी असून दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. देश-विदेशातून भाविक या नगरीत येत असतात. त्यामुळे गोदावरीचे जल शुध्द असले पाहिजे, यासाठी नाशिक महापालिकेने योजना आखली आहे, त्यानुसार नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरी शुध्दीकरण व सुशोभिकरणासाठी निधी मिळावा, अशी मागणी महापौर कुलकर्णी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी केली. शेखावत यांनी त्यास तत्त्वत: मान्यता देतानाच येत्या २-३ दिवसात राज्याचे मुख्यमंत्री, नाशिकचे महापौर, तसेच आयुक्तांना देखील पत्र पाठविण्यात येईल, असे शेखावत यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृह नेते कमलेश बोडके, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक जगदीश पाटील, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.
इन्फो...
राजनीती नव्हे, महापौरांची जलनेती
निवडणुकीच्या तोंडावर करून दाखवले, असे दाखवण्यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ दिल्लीला गेल्यानंतर भाजपाच्या राजनीतीची चर्चा सुरू असली तरी, महापौरांनी मात्र जलनेती केली, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय जलमंत्री शेखावत यांच्या भेटीनंतर भाजप शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आणि नमामि गोदा प्रकल्पाविषयी महापौरांनी पंतप्रधानांना माहिती दिली. यावेळी देखील महापौरांनी 'जलनेती' पुस्तिका भेट म्हणून दिली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार देखील उपस्थित हेात्या.
----