नाशिक : दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या नाशिकच्यागोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारकडून १८०० कोटी रुपयांचे पॅकेज मिळावे, यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ रविवारी (दि.८) दिल्लीला रवाना झाले. मंगळवारी ( दि. १०) त्यांची केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासमवेत बैठक होणार आहे.
रविवारी रेल्वेने महापौर सतीश कुलकर्णी तसेच उपमहापौर भिकूबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते कमलेश बोडके तसेच आमदार देवयानी फरांदे आणि ॲड. राहुल ढिकले रवाना झाले आहेत.
सात राज्यांमधून जाणारी गोदावरी नदी हा सध्या नाशिकमध्ये संवेदनशील विषय आहे. पर्यावरणप्रेमी नदीच्या शुद्धीकरणासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. निरी या संस्थेच्या शिफारशीनुसार महापालिकादेखील गोदावरी शुद्धीकरणासाठी विविध प्रयत्न करत आहे. नाशिक शहरातील नाल्यांमधील गटारीचे पाणी हे मलनिस्सारण केंद्रात सोडून त्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. अनेक वर्षांपासून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. निरी या संस्थेने नवीन निकष जारी केल्यामुळे आता नदीतील प्रक्रियायुक्त मलजलाचा बीओडी दहाच्या आत असावा लागणार आहे. त्यामुळे मलनिस्सारण केंद्रांच्या नूतनीकरणाचा खर्च मोठ्या प्रमाणात येणार आहे. शहरातील नाले हे केवळ पावसाळ्यातच नैसर्गिक पाण्याने प्रवाही राहिले पाहिजे, हा महापौरांचा कटाक्ष आहे. त्यामुळे हे नाले प्रदूषणमुक्त करण्यासाठीदेखील निधीची गरज आहे. महापालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव वेळोवेळी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठविला आहे. परंतु, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. महापालिकेला या सर्व कामांसाठी १८०० कोटी रुपयांचे पॅकेज हवे आहे. त्यामुळे दिल्लीत मंगळवारी (दि १०) केंद्रीय मंत्री शेखावत यांची भेट घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीदेखील भेट घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या प्रतिनिधी मंडळात शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता संजय घुगे आदी अधिकारीदेखील सहभागी आहेत.
...कोट...
गोदावरी शुद्धीकरणासाठी महापालिकेने तयार केलेला प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. आता थेट केंद्रीय जलमंत्र्यांची भेट घेऊन निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक