वणी-सापुतारा रस्त्यावर २ कोटीची तंबाखु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 06:51 PM2021-01-17T18:51:40+5:302021-01-17T18:52:23+5:30
वणी : राजस्थान येथुन बेंगलोरला कटेनरमधुन वाहतुक केली जाणारी दोन कोटी दहा लाख रुपयांचा मिराज कंपनीची तंबाखु वणी सापुतारा ...
वणी : राजस्थान येथुन बेंगलोरला कटेनरमधुन वाहतुक केली जाणारी दोन कोटी दहा लाख रुपयांचा मिराज कंपनीची तंबाखु वणी सापुतारा रस्त्यावरील करंजखेड फाट्यावर पकडण्यात आली असुन वणी पोलीसांच्या मोठ्या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणलेआहे. परराज्यातुन विशेषतः राजस्थान राज्यातुन गुजरातमार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या वस्तुची तस्करी होत असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत यांना मिळाली. सदर माहीतीची खातरजमा करण्यासाठी गोपनीय पद्धतीने माहीती संकलीत केली.
त्यात तथ्यांश आढळल्याने पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तस्करीचा मार्ग शोधताना महत्वाचे धागेदोरे मिळताच वणी सापुतारा रस्त्यावर शनिवारी रात्री उशिरा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत व पोलीस पथक करंजखेड फाट्यावर सापळा लावला असता आर जे ३० जीए ३८२४ व आर जे ३० जीए ३९१४ या क्रमांकाचे दोन कंटेनर सापुतारा मार्गे संशयास्पद मार्गक्रमण करत असल्याची बाब निदर्शनास आली.
सदरचे दोन्ही कंटेनर पोलीसांनी अडविले व त्यांची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला मिराज कंपनीची तंबाखु बॉक्समधे पॅकींग स्वरुपात असल्याची बाब तपासात पुढे आली. सदरची दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली. रविवारी (दि.१७) सकाळी या दोन्ही वाहनामधुन गृहरक्षक दलाचे जवान व पोलीस कर्मचारी यांनी खोक्यांची वाहतुक करुन वाहनामधुन हा माल उतरवला. त्यानंतर तपासणी करुन मोजदाद केली तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहीती देण्यात आली. उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.
सदर मालाच्या तपासणी अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली. सुमारे दोन कोटी दहा लाख असे मुल्यांकन सदर तंबाखुचे असल्याची माहीती देण्यात आली. (१७ वणी)