नाशिक : नाशिक जिल्ह्यात मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, ४६ लाख ५० हजार ६४० इतके मतदार आहेत. मात्र, यामध्ये नवमतदारांची संख्या अवघी ८५ टक्के असल्याने या नवयुवक मतदारांच्या नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाख नवयुवक मतदार असताना त्यांच्या नोंदणीची टक्केवारी अवघी ८५ टक्केच असल्याने ही टक्केवारी वाढविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. २७) जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४६,५०,६४० आहे. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील नवयुवकांची संख्या ही २ लाख १९ हजार इतकी असून, २० ते २९ या वयोगटातील युवकांची संख्या ही १७ लाख ८० हजार इतकी आहे. परंतु, मतदार नोंदणी अवघी ४४,३४१ इतकीच आहे. या संख्येच्या तुलनेत झालेली मतदार नोंदणी लक्षात घेता, जिल्ह्यातील नवयुवकांची नोंदणी वाढविणे गरजेचे असल्याने ५१ महाविद्यालयांशी करार करण्यात आला आहे.
या माेहिमेत १८ ते १९ वयोगटातील मतदार नोंदणीचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची दुबार नावे वगळण्याबाबत प्रशासनामार्फत लवकरच परिपत्रक काढून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.