नाशिक : महिन्याच्या प्रारंभी ९८ टक्क्यांवर पोहोचलेल्या कोरोनामुक्त रुग्णांच्या टक्केवारीत गत पंधरा दिवसांत २ टक्क्यांनी घट येऊन हे प्रमाण ९६.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गत दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या तसेच मृत्यूच्या प्रमाणातही सातत्याने वाढ होत आहे. नाशिक शहरात कोरोनामुक्तीची वाटचाल गत महिन्याच्या अखेरपर्यंत वेगात होती. त्यामुळे फेब्रुवारीअखेर किंवा मार्चअखेरपर्यंत कोरोनाचे अस्तित्व संपण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतरच्या आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या वाढीस प्रारंभ झाला असून हा वेग सातत्याने वाढत आहे. गत आठवडाभरात तर सातत्याने बाधितांची संख्या अडीचशे, तीनशेहून अधिकच राहिली. तसेच मृतांचा आकडादेखील एक किंवा दोनवरून तीनवर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ७९० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २०, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात २०७ तर जिल्ह्याबाहेरील १९ असे एकूण १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख १९ हजार ६०६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मध्ये ९६.२७ टक्के, नाशिक शहरात ९७.३८ टक्के, मालेगावमध्ये ९२.१६ टक्के तर जिल्हा बाह्यरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ इतके आहे. नाशिक ग्रामीण ८२१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३३, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १७६ व जिल्ह्याबाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.४ दिवसांत ११ मृत्यू दिवसभरात एक किंवा दोन किंवा कधी तर एकही मृत्यू नाही, असे प्रमाण गत महिन्यात सातत्याने येऊ लागले होते. मात्र, १७ फेब्रुवारीला ३ मृत्यू, १८ फेब्रुवारीला २ मृत्यू तर १९ आणि २० फेब्रुवारीला पुन्हा प्रत्येकी ३ मृत्यू असा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे गत ४ दिवसांत मिळून एकूण ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील कोरोनामुक्तांमध्ये २ टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 1:04 AM