शहरात २०, २३, २४ कॅरेट दागिन्यांचेही हाॅलमार्किंंगनुसार व्यवहार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:11+5:302021-06-19T04:10:11+5:30
नाशिक : देशात साेने आणि दागिन्यांच्या विक्रीला हाॅलमार्किंग असणे बंधनकारक करण्यात आले असून हॉलमार्किंगच्या नियमांमध्ये व्यावसायिकांना अपेक्षित बदलांनुसार ...
नाशिक : देशात साेने आणि दागिन्यांच्या विक्रीला हाॅलमार्किंग असणे बंधनकारक करण्यात आले असून हॉलमार्किंगच्या नियमांमध्ये व्यावसायिकांना अपेक्षित बदलांनुसार केंद्र शासनाने निर्णय घेत २०, २३ आणि २४ कॅरेटच्या दागिन्यांनाही हॉलमार्किंग करून व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात मंगळवारी (दि. १५) रात्री दिल्लीतील केंद्रीय मंत्री पीयूष गाेयल आणि व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात झाला आहे; परंतु यासंदर्भात अद्याप अध्यादेश जाहीर झाला नसल्याने व्यावसायिकांना अध्यादेशासह त्यातील तरतुदींविषयी उत्सुकता लागलेली आहे.
महाराष्ट्रातील सराफ बाजारात सर्वाधिक व्यवसाय होत असलेल्या २०, २३, २४ कॅरेट दागिन्यांचाही हाॅलमार्कमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. केंद्र शासनाने अखेर सराफ व्यावसायिकांची मागणी मान्य केल्यामुळे आता नाशिक शहरासह संपूर्ण देशभरात या दागिन्यांची हॉलमार्किंगनुसार खरेदी-विक्री होणार आहे. दरम्यान, ४० लाख रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या सराफांना यातून वगळण्यात आले असून ३१ ऑगस्टपर्यंत साेन्याच्या दागिन्यांचे उत्पादक, हाेलसेलर्स आणि रिटेलर्स यांना नाेंदणीकरिता वेळ देण्यात आली आहे. या कालावधीत काेणतीही दंडात्मक कारवाई हाेणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
इन्फो-
मागणी मान्य झाल्याने दिलासा
देशात, १५ जूनपासून २५६ जिल्ह्यांत हाॅलमार्किंग सक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी १४, १८ आणि २२ कॅरेट दागिने हाॅलमार्किंगशिवाय विक्री करण्यास मनाई करण्यात आली हाेती. तसेच याकरिता सराफ व्यावसायिकांनी नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात आले हाेते. मात्र, हाॅलमार्किंग सेंटर्सची कमतरता आणि पुरेशा सुविधांअभावी हाॅलमार्किंग सक्ती याेग्य नाही, असाही मतप्रवाह व्यावसायिकांमधून उमटत होता. तसेच २३ व २४ कॅरेट दागिन्यांचाही हाॅलमार्किंगमध्ये समावेश असावा, अशी मागणीही हाेत हाेती. या मागण्या मान्य झाल्याने सराफ व्यावसायिकांना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी व्यक्त केली आहे.