बागलाण तालुक्यात तब्बल २० टक्के शिक्षक अपंग
By Admin | Published: July 5, 2017 11:51 PM2017-07-05T23:51:15+5:302017-07-05T23:51:54+5:30
शिक्षक पोर्टलवर माहिती : बोगस अपंगांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
ताहाराबाद : प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेमुळे बोगस अपंग शिक्षकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात अपंगांचे प्रमाण सरासरी दोन ते तीन टक्के असताना बागलाण तालुक्यात बदलीपात्र शिक्षकांपैकी तब्बल २० टक्के शिक्षक अपंग असल्याची धक्कादायक माहिती शिक्षक पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बोगस अपंग शिक्षकांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने पुढाकार घेतला असून, बोगस अपंग शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अपंग शिक्षकांना बदली प्रक्रि येत सूट दिली जाते. आरोग्य विभागाची भ्रष्ट यंत्रणा बोगस अपंग कर्मचारी वाढविण्यात सक्रिय असल्याने अपंगांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे शासनाने अपंग प्रमाणपत्रांऐवजी अपंग शिक्षक फेरतपासणी मोहिम राबवावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक परीषद संघटनेने केली आहे.
राज्य सरकारने यंदा जाहीर केलेल्या धोरणातून बोगस अपंगांच्या मणके विकारास वगळण्यात आले आहे. त्यामुळे मणकेविकारग्रस्त शिक्षकांना बदलीत सवलत मिळण्याचा मार्ग बंद झाल्याने शिक्षकांत नाराजी निर्माण झाली आहे. मणके विकार वगळताना बोगस अपंग शिक्षकांच्या प्रश्नावर सरकार मात्र मूग गिळून गप्प बसल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. बदल्यामध्ये सूट मिळावी, तसेच अपंगांचे आर्थिक फायदे मिळावेत म्हणून जिल्ह्यात शेकडो शिक्षकांनी दृष्टीदोष, कर्णदोष आदी आजाराचे बोगस दाखले काढल्याच्या तक्र ारी अपंग शिक्षक व कर्मचारी संघटनेने केली आहे. अर्थात याकामी भ्रष्ट आरोग्य यंत्रणेचे भक्कम पाठबळ असल्याने त्यावर कारवाई होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
बोगस मणकेग्रस्त शिक्षकांना बदलीत सूट मिळू नये, म्हणून शासनाने मणके आजार रद्द केला आहे. बोगस अपंगांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी याकामी लक्ष घालून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर कारवाई करावी, अशी मागणी खऱ्या अपंग शिक्षकांनी केली आहे.
सोशल मीडियाचा आधार
बोगस अपंग शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडून आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी व्हॉटसअॅपसारख्या सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला आहे. बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष संतोष सावंत यांनी आम्ही सशक्त शिक्षक अशा घोषवाक्यातून जिल्हस्तरीय शिक्षकांचे संघटन केले आहे. सोशल मीडियावर बोगस अपंग शिक्षकांचा खरपूस समाचार घेतला जात असल्याने शैक्षणीक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.जिल्ह्यात बोगस अपंग शिक्षकांच्या अनेक तक्र ारी संघटनेकडे आल्या आहेत. आरोग्य यंत्रणेतील एजेंट यांचे जाळे यास खतपाणी घालते. धडधाकट शिक्षकांकडून अपंगांच्या सवलतीवर डल्ला मारणे, ही अत्यंत्य लाजीरवाणी बाब आहे. राज्यात सर्वाधिक अपंग कर्मचारी नाशिक जिल्ह्यात आहेत. शासनाने बोगस अपंगांवर अहमदनगर जिल्हा परिषदेप्रमाणे कठोर कारवाई करावी.
- प्रमोद लोखंडे, जिल्हा सचिव,
अपंग अधिकारी, शिक्षक व कर्मचारी संघटना नाशिक