मालेगावसाठी २३५ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध; कृषिमंत्री दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:46+5:302021-04-19T04:13:46+5:30
जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. यासाठी औद्योगिक ऑक्सिजन प्लांट अधिग्रहीत करुन तेथे मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करण्यात यावी, ...
जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. यासाठी औद्योगिक ऑक्सिजन प्लांट अधिग्रहीत करुन तेथे मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी व अन्न व औषधे प्रशासनास दादा भुसे यांनी केली होती. त्यानुषंगाने माळेगांव, सिन्नर एम. आय. डी. सी.मधील श्री गणेश एंटरप्रायजेस यांना जिल्हाधिकारी व अन्न, औषध प्रशासनाने आवश्यक त्या परवानग्या तत्काळ प्रदान करून मेडिकल ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यास मान्यता दिली. या प्लांटमध्ये निर्मित झालेल्या ऑक्सिजनचे २३५ सिलिंडर प्रथम मालेगाव येथील रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिले. याबद्दल भुसे यांनी जिल्हाधिकारी, अन्न, औषध प्रशासन व श्री गणेश एंटरप्रायजेसच्या संचालकांचे आभार मानले.
ऑक्सिजनच्या २३५ सिलिंडरचे वाहन मालेगावात दाखल झाल्याने सदर वाहनाची भुसे यांचे हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी प्रमोद शुक्ला, संजय दुसाने, प्रांताधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस, डॉ. जतीन कापडणीस, भाऊसाहेब जाधव, प्रवीण जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री गणेश एंटरप्रायजेसमार्फत मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती झाल्याने जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. याप्रमाणेच जिल्ह्यातील आणखी दोन औद्योगिक ऑक्सिजन प्लांटचे रुपांतर मेडिकल ऑक्सिजन प्लांटमध्ये होणार असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले.