लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून नगरसाठी आरक्षित असलेले अखेरचे आवर्तन पूर्ण झाले असून, धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेला ३१ जुलैपर्यंत ९१६.६५ दलघफू पाणीसाठ्याची आवश्यकता भासणार आहे, मात्र गंगापूर धरण समूहातील केवळ ८३५.९० दलघफू पाण्याचेच आरक्षण शिल्लक आहे. त्यामुळे अतिरिक्त सुमारे १०० दलघफू पाण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे.गंगापूर धरणातून गेल्या १५ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदर पाणी नांदूरमधमेश्वर धरणात सोडले जात असून, त्याठिकाणी डाव्या कालव्यामार्फत राहाता, तर उजव्या कालव्यामार्फत कोपरगावसाठी आवर्तन दिले जात आहे. नगरसाठी गंगापूर धरणात १ हजार दलघफू पाण्याचे आरक्षण होते. अखेरचे आवर्तन आता पूर्ण झाले असून, धरणातून आता विसर्ग होणार नसल्याचे पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात आले. ३१ मे २०१७ अखेर गंगापूर धरण समूहात १८११ दलघफू म्हणजे १९.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात गंगापूर धरणात १३६५ दलघफू म्हणजे २४.२५ टक्के, काश्यपीमध्ये ३७४ दलघफू म्हणजे २०.१९ टक्के, तर गौतमी धरणात ७२ दलघफू म्हणजे ३.८४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेला दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या २९२ दिवसांच्या कालावधीसाठी गंगापूर धरण समूहात ३९०० दलघफू तर दारणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित आहे. त्यात ३० मे २०१७ अखेरपर्यंत गंगापूर धरण समूहातील ३०६४.१० दलघफू पाण्याची उचल करण्यात आली आहे. दारणा धरणातून मात्र २२३.९७ दलघफू पाणीसाठाच महापालिकेला उचलता आलेला आहे. दारणा धरणाने आता तळ गाठला असून, केवळ ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेची आता सारी भिस्त गंगापूर धरणातील पाण्यावरच आहे. गंगापूर धरणात ८३५.९० दलघफू इतकाच आरक्षित पाणीसाठा शिल्लक असून, दारणातून १७६.०३ आरक्षित पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेमार्फत गंगापूर धरणातून सद्यस्थितीत प्रतिदिन १४.५५ दलघफू पाणी उचलले जात आहे.
गंगापूर धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक
By admin | Published: June 01, 2017 2:09 AM