जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीतील स्काय ताज आणि स्काय लगून व्हिला या दोन अलिशान बंगल्यांमध्ये ‘बिग-बॉस’ या मराठी सिझन - २ मध्ये वाईल्ड कार्ड घेऊन सहभागी झालेली अभिनेत्री हिना पांचालसह बॉलिवूड व दक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले कलाकार, कोरिओग्राफर असे एकूण २२ तरुण-तरुणी एकत्र येत दारु, हुक्का, गांजा, चरस, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांचे सेवन करत ‘हवाईयन थीम’च्या रेव्ह पार्टी करत होते. याबाबतची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांना मिळाली. त्यांनी त्वरित याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना कळविले. त्यांचा ग्रीन सिग्नल मिळताच वालावलकर, उपिभागीय अधिकारी अर्जुन भोसले हे साध्या वेशात इगतपुरी पोलिसांचा फौजफाटा घेऊन मध्यरात्री बंगल्यांवर जाऊन धडकले. यावेळी पोलिसांनी पांचालसह १२ महिला आणि दहा पुरुषांना बंगल्यांमधून ताब्यात घेतले होते. सोमवारपर्यंत या गुन्ह्यातील संशयितांची संख्या २९वर जाऊन पोहोचली होती. त्यामध्ये ११ महिला आणि १८ पुरुषांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. यापैकी ७ पुरुषांवर गुंगीकारक औषधी द्रव्य मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५च्या (एनडीपीएस) कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर उर्वरित दहा पुरुषांसह ११ महिलांविरुद्ध कोटपा कायदा, दारूबंदी कायदा आणि कलम-१८८नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.
--इन्फो--
रक्त, लघवीचे नमुने प्रयोगशाळेत
रेव्ह पार्टीतील २२ तरुण-तरुणींची वैद्यकीय तपासणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्यांच्या सर्वांचे रक्त व लघवीचे नमुनेही संकलित करून न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दरम्यान, यापैकी प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार एनडीपीएस कायद्यांतर्गत संशयितांची संख्या वाढण्याची श्यक्यता आहे.
---इन्फो---
बंगलामालक सोनीलाही पोलिसांनी केली अटक
स्काय ताज, स्काय व्हिला लगून या दोन बंगल्यांचा नव्हे तर असे इगतपुरीत चार बंगल्यांचा मालक असलेल्या संशयित रणवीर सोनी यांनाही या रेव्हपार्टीप्रकरणी पाेलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. तो व्यावसायिक असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.