महावितरणच्या भरारी पथकाने वडाळा गाव ‘सानिया हाऊस’ या बंगल्याच्या वीज मीटरची तपासणी केली. त्यांना वीज मीटर ६६.१९ टक्के इतक्या प्रमाणात कमी विजेची नोंद करत असल्याचे निदर्शनास आले. वीज मीटरची अवस्था ही संशयास्पद असल्याचे लक्षात आल्याने ते काढून सील करून जेलरोड पंचक येथील टेस्टिंग युनिटला पाठविण्यात आले. तपासणीत हे वीज मीटर ६८.३२ टक्के इतक्या कमी प्रमाणात विजेची नोंद करत असल्याचे आढळले. ते खोलून तपासले असता मीटरच्या उजव्या बाजूला छिद्र केलेले होते. वीज मीटरमध्ये छेडछाड करून संशयित शाहरुख पठाण, शकील शेख, हाजिरा बी. शेख यांनी २६ महिन्यात १ लाख ९२ हजार १७० रुपये किमतीची (८,४११ युनिट एकुण वीज वापर) वीज चोरी केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथकामध्ये कनिष्ठ अभियंता डी. जी. पंडोरे, पी. आर. चव्हाण व तंत्रज्ञ एल. एम. सोनवणे यांचा कारवाईत सहभाग होता.
--इन्फो---
...अशी केली वीज मीटरमध्ये छेडछाड
सानिया हाऊसमधील वीज मीटरमध्ये संशयितांनी आतील बाजूने निर्देशक लिमिट स्वीचवर रासायनिक द्रव्ये टाकल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या स्वीच असलेल्या अवस्थेत कायमचा घट्ट केलेला आढळून आला. वीजप्रवाहाच्या नोंद करण्याच्या मीटरमधील फेज व न्यूट्रल या दोन्ही सीटी सर्किट बोर्डावर शाॅर्ट केल्याचे पथकाच्या लक्षात आले. विजेची दाब नोंदी ज्या पांढऱ्या वायरीमुळे होते ती वायर मूळ स्थितीत न ठेवता तेथून काढत दुसरीकडे लावलेली होती, असे भरारी पथकाने सांगितले.