शहरात आज ३३ कोरोनाबाधित; नाईकवाडीपुरा भागातील वृध्दाचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:54 PM2020-06-09T22:54:24+5:302020-06-09T22:55:46+5:30
शहराची कोरोनाबाधितांची संख्या आता सुमारे ४८७ वर. महापालिका हद्दीतील १६८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन उपचारानंतर घरी गेले आहेत...
नाशिक : शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी (दि.८) नवे २८ रुग्ण महापालिका क्षेत्रात आढळून आले. मंगळवारी (दि.९) यामध्ये अधिक वाढ झाली आणि मनपा हद्दीत रात्री दहा वाजेपर्यंत कोरोनाचे एकूण नवे ३३ रूग्ण आढळून आले. त्यापैकी जुन्या नाशकातील सहा रुग्ण आहेत. शहराची कोरोनाबाधितांची संख्या आता सुमारे ४८७ वर पोहचली आहे.
जुन्या नाशकात मागील तीन दिवसांत या भागात तब्बल ४७ रुग्ण आढळून आले आहे. मंगळवारी सकाळी जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा परिसर संपुर्ण ‘सील’ केला गेला. महापालिका हद्दीत एकूण प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता ९७ झाली आहे. जवळपास निम्मे शहर प्रतिबंधित म्हणून घोषित केले गेले आहे, तरीदेखील नागरिक तितक्याच मोठ्या प्रमाणात गरज नसतानाही सर्रासपणे घराबाहेर पडताना दिसून येत आहे.
जुने नाशिक परिसर शहराचा नवा हॉटस्पॉट बनला असून हा संपुर्ण परिसर तत्काळ महापालिकेने ‘कन्टेंन्मेंट झोन’ म्हणून ‘सील’ करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नाईकवाडीपुरा भागातील एका ७० वर्षीय वृध्दाचा कोरोना आजाराने बळी घेतला. या परिसराने अद्याप चार ते पाच रहिवाशी मागील आठवडाभरात कायमचे गमावले असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. जुने नाशिकमधील नाईकवाडीपु-यात मंगळवारी तीन तर आझाद चौक (चव्हाटा)-१, कोकणीपुरा-१, बागवानपुरा चौक-१, अमरधामरोड-१, भाभानगर-१, जयदीपनगर-१, पेठरोड-३, दिंडोरीरोड-१, महात्मानगर-१, टाकळीरोड-१, सरदार चौक (पंचवटी)- ३, नाग चौक (पंचवटी)-३, फुलेनगर-१, टाकळीरोड-२,
काठेमळा (तपोवनरोड)- ३, सातपूर कॉलनी-३ असे रुग्ण आढळून आले. सोमवारी रविवारपेठेत तर मंगळवारी महात्मानगर या उच्चभ्रू वस्तीत कोरोनाचा शिरकाव झालेला पहावयास मिळाला. नाशिक शहरातील जवळपास सर्वच उपनगरामंध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सुदैवाने मागील चार ते पाच दिवसांपासुन वडाळागाव परिसरासह खोडेनगर या भागात नवे रुग्ण मिळून आलेले नाही.
महापालिका हद्दीतील १६८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन उपचारानंतर घरी गेले आहेत तर सध्या २९७ रुग्ण उपचारार्थ विविध कोरोना कक्षांमध्ये दाखल आहेत. शहरात अद्याप २२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्याचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १ हजार ६८३ वर पोहचला आहे. तसेच जिल्ह्यात ४८८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच जिल्ह्यात कोरोनाने १०२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दिवसेंदिवस जुन्या नाशकातील रुग्णसंख्या वेगवेगळ्या भागात वाढू लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एकीकडे लॉकडाऊन शिथिल केला जात असून राज्य शासनाच्या आदेशान्वये मनपा प्रशासन ‘मिशन बिगेन अगेन’ राबविण्याचा प्रयत्ना आहे, तर दुसरीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे.