नाशिक - मागील तीन वर्षात शासकीय आश्रमशाळेतील 353 विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पालकांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला असला तरी शाळेत असताना झालेल्या मृत्यूबाबत काय कारवाई झाली, हा प्रश्नच आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदान वाटपातही चालढकल होत आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप केले जाते. बहुतेक पालकांना अनुदान मिळाले असले तरी, सन 2020-21 मधील 19 विद्यार्थ्यांचे पालक अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. राज्यात एकू 499 शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात. ही अनुदान योजना 2018 पासून राबविली जात आहे. शाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तरच, त्याची जबाबदारी शाळांवर असते. सन 2018 ते 2020 या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण 353 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
ही आहेत मृत्यूची कारणे
आश्रमशाळांमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पालकांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते. यात अपघात, आजारपण, सर्पदंश, उंचावरुन पडल्याने, विहिरीत पडून अशा वेगवेगळ्या कारणांनी विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असतो. अनेकवेळा विद्यार्थी पालकांबरोबरच मोलमजुरी करण्यासाठी बाहेरगावी जात असतात काहीवेळा तिकडेच त्यांच्यावर संकट ओढवत असते.
विभागनिहाय मृत विद्यार्थ्यांची संख्या
विभाग २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१
नाशिक ४२ ६२ ६२
ठाणे २१ २६ ३६
अमरावती १५ १८ १८
नागपूर १० १३ ३०