नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने ३,७१२ कोरोनाबाधित आढळले तर मृतांच्या संख्येतही तब्बल ३३ पर्यंत वाढ झाली. एकाच दिवसातील ३३ बळींमुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या २,६२९ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार सुरूच असून त्यात सतत वाढ होऊ लागल्याने नाशिककरांच्या चिंतेत भर पडत चालली आहे. शुक्रवारी साडेतीन हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १९४२, नाशिक ग्रामीणमध्ये १६६६, मालेगाव मनपा क्षेत्रात ५६, तर जिल्हा बाह्य क्षेत्रामध्ये ४८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचारार्थी रुग्णांची संख्या तब्बल ३६,२३५ वर पोहोचली आहे. शहरासह जिल्ह्यातील रुग्णांसह जिल्ह्याबाहेरून नाशिकच्या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येला ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील सातत्याने खाली येत असून, शुक्रवारी हे प्रमाण ८२.५० टक्क्यांवर आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात ३,२९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी बळी गेलेल्या नागरिकांपैकी ५ नागरिक नाशिक मनपा क्षेत्रातील, २६ नाशिक ग्रामीणमधील आणि जिल्हा बाह्य २ रुग्ण आहेत.
इन्फो
प्रलंबित ६ हजारानजीक
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना प्राप्त होणाऱ्या अहवालांचे प्रमाण त्या पटीत वाढविणे यंत्रणेला अद्यापही शक्य झालेले नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळण्यास सातत्याने विलंब होत आहे. जिल्ह्यात गुरुवारी प्रलंबित अहवालांची संख्या थेट ५९१० वर पोहोचली आहे.
इन्फो
ग्रामीणमध्ये तब्बल २६ बळी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावानंतर सातत्याने नाशिक शहरातील मृत्यूंचे प्रमाण अधिक होते. मार्च अखेरपासून काही वेळा शहरातील तर काही वेळा नाशिक ग्रामीणमधील बाधितांचे मृत्यू अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यातही एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून ग्रामीणमधील मृत्यू सतत अधिक झाले. मात्र शुक्रवारी तर ग्रामीण भागातील आतापर्यंतचे सर्वाधिक २६ बळी नोंदविले गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.