शहरातील ३८३ रुग्णालये अनधिकृत
By Admin | Published: March 11, 2017 01:58 AM2017-03-11T01:58:28+5:302017-03-11T01:58:51+5:30
नाशिक : शहरातील ३८३ रुग्णालयांनी नूतनीकरण केले नसून अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे.
नाशिक : नर्सिंगहोम आणि मुंबई शुश्रुषागृहे अधिनियम १९४९ अंतर्गत शहरातील ३८३ रुग्णालयांनी नूतनीकरण केले नसून अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयांवर महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालये व प्रसूतीगृहे यांना नर्सिंगहोम अंतर्गत नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणीकृत व्यावसायिकांनी ३१ मार्च २०१५ पासून तीन वर्षांकरिता नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे गरजेचे होते. परंतु, शहरातील ३८३ रुग्णालयांनी नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरणच केले नसल्याचे समोर आले आहे. शहरातील ५६६ रुग्णालयांपैकी केवळ १८३ रुग्णालयांच्याच नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण झालेले आहे. शहरात १८२ मॅटर्निटीहोम असून, ३८४ नर्सिंगहोम व हॉस्पिटल आहेत. त्यात १०५ मॅटर्निटी होम आणि ७८ नर्सिंगहोमच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण झालेले आहे. तब्बल ७७ मॅटर्निटी होम आणि ३०६ नर्सिंगहोम व हॉस्पिटलचे अद्याप नूतनीकरण झालेले नाही. त्यात नूतनीकरणासाठी ४१ मॅटर्निटी होम, तर १८९ नर्सिंगहोमचे प्रस्ताव मनपाकडे आलेले आहेत, तर अद्याप ३६ मॅटर्निटी होम व ११७ नर्सिंगहोमचे नूतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल झालेले नाहीत. सदर नर्सिंगहोम व मॅटर्निटी होम यांनी तत्काळ नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करून घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने दिला आहे.