जिल्ह्यात लसीकरणाचा ४ दिवसांचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:31+5:302021-04-09T04:15:31+5:30
नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लस संपुष्टात आली असली तरी नाशिक जिल्ह्यात किमान ४ दिवस पुरेल इतका लसींचा साठा ...
नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लस संपुष्टात आली असली तरी नाशिक जिल्ह्यात किमान ४ दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार त्याची प्रशासनालादेखील माहिती नाही.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून लस कितपत उपलब्ध होईल, त्याची माहितीदेखील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. जिल्ह्याला गत आठवड्यात १ लाख ९० लसींचा साठा उपलब्ध झाला होता. या साठ्यातून दिवसाला १६ हजार ते २० हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे सहा दिवसांत सुमारे १ लाखाहून अधिक लसींचे डोस संपुष्टात आले आहेत. अशा परिस्थितीत आता सध्याच्याच प्रमाणात लसीकरण सुरु ठेवल्यास ही लस रविवार किंवा सोमवारपर्यंतच पुरू शकणार आहे. त्यानंतर पुन्हा त्वरित लस उपलब्ध झाली तरच लसीकरण सुरळीत सुरू राहू शकणार आहे. अन्यथा अन्य जिल्ह्यांप्रमाणे पुन्हा नाशिकलादेखील लसीकरणात खंड पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
इन्फो
लसीकरणासाठी रांगा
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाकडे पाहून घाबरलेल्या नागरिकांनी आता लसीकरणासाठी रांगा लावल्याचे दृश्य सर्वच लसीकरण केंद्रांवर दिसून येत आहे. नागरीक नोंद केल्यानंतर सकाळी लवकरच रांगेत उभे राहून लसीकरण करून घेण्यास प्राधान्य देत आहेत. तर ज्यांचा लसीचा पहिला डोस एक महिन्यापूर्वीच झाला आहे, असे नागरिकदेखील दुसऱ्या लसीसाठी घाई करीत असल्याचे दिसून येत आहे.