नाशिक : नवीन शेतजमीन खरेदी केल्याने कुटुंब ते बघण्यासाठी ट्रॅक्टरमधून निघाले होते. जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भावडबारी घाटात ट्रॅक्टर अचानकपणे उलटल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची अवस्थाही बघवत नव्हती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृतांमध्ये सर्व चांदवड तालुक्यातीलशेलुपुरी गावातील रहिवाशी असल्याचे बोलले जात आहे. शेती बघण्यासाठी देवळ्याला जात असताना भावडबारी घाटात काळाने त्यांच्यावर झडप घातली. मुलांमध्ये लहान मुलासह महिला, पुरूषाचा समावेश असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, चांदवड तालुक्यातील पुरी गावात राहणारे एकाच कुटुंबातील नऊ शनिवारी (दि.६) सकाळी टॅक्ट्ररच्या ट्रॉलीमध्ये बसून देवळ्याच्या प्र्रवासाला निघाले होते. हा ट्रॅक्टर विंचूर प्रकाश मार्गावर असलेल्या भावडबारी घाटातून देवळ्याकडे जात होता. घाटातील अखेरच्या टप्प्यातील अपघाती वळणावर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर उतारावरच उलटला. यामुळे ट्रॅक्टरचे सर्व भाग सुटे तर झालेच मात्र जीवीतहानी सुध्दा झाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह व जखमींना तत्काळ देवळा व मालेगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा देवळा आणि एका शेतमजूराचा मालेगाव रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण अपघाताने चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये दोन पुरूष एक मुलगा व महिलेचा समावेश आहे. या अपघातात ट्रॅक्टरमधील पाच ते सात लोक जखमी झाले असून त्यांच्यावर देवळा ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.