इंदिरानगरला ३ महिन्यांत ४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:28 AM2019-07-15T01:28:53+5:302019-07-15T01:30:02+5:30
पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सातत्याने ‘बदली प्रयोग’ करत पोलीस ठाणे प्रमुखांची खांदेपालट केली जात आहे. या तीन महिन्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या कारभाराची सूत्रे चार अधिकाऱ्यांच्या हाती सोपविली गेली. त्यामुळे इंदिरानगर पोलीस धार्जिणे ठरत नसल्याचा सूर ऐकू येत आहे.
इंदिरानगर : पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सातत्याने ‘बदली प्रयोग’ करत पोलीस ठाणे प्रमुखांची खांदेपालट केली जात आहे. या तीन महिन्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या कारभाराची सूत्रे चार अधिकाऱ्यांच्या हाती सोपविली गेली. त्यामुळे इंदिरानगर पोलीस धार्जिणे ठरत नसल्याचा सूर ऐकू येत आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याची हद्द जॉगिंग ट्रॅक ते विल्होळी जकात नाक्यापर्यंत आहे. यामध्ये इंदिरानगर राजीवनगर, वडाळागाव, पाथर्डीसह राजीवनगर झोपडपट्टी, कवटेकर वाडी आदी परिसरांचा समावेश होतो. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, घरफोडी, हाणामारीसह विविध गुन्हे सातत्याने घडत आहेत. या पोलीस ठाण्याला अद्याप जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळाले ते दीड ते दोन महिन्यांपेक्षा जास्त टिकू शकले नाहीत. तीन महिन्यांमध्ये या पोलीस ठाण्याने चार ठाणेप्रमुख बघितले. यामध्ये नारायण न्याहाळदे यांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली त्यांच्या जागी अनिल पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती, परंतु एका धाब्यावर केलेली दबंगगिरी त्यांना भोवली. अवघ्या दीड महिन्यात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांची थेट नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली. त्यांच्या जागी आबा पाटील यांची नेमणूक करण्यात आली, मात्र पंधरवड्यापेक्षा जास्त काळ तेदेखील टिकू शकले नाही. त्यानंतर ठाणे प्रमुखाची सूत्रे कुमार चौधरी यांच्या हातात दिली गेली, मात्र त्यांचीही दीड महिन्यात बदली करण्यात आली.
सोमवंशी यांच्यापुढे आव्हान
विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्याकडे इंदिरानगर पोलीस ठाण्याची सूत्रे दिली गेली. सरकारवाड्यासारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाणे प्रमुखाचा अनुभव पाठीशी असलेल्या सोमवंशी यांच्यापुढे इंदिरानगरमधील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र त्यांना आपली कामगिरी दाखविण्यासाठी किती कालावधी मिळतो, हे लवकरच दिसून येईल.