नाशिकचे ४० भाविक अमरनाथला अडकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 01:35 AM2022-07-09T01:35:41+5:302022-07-09T01:36:01+5:30
अचानक झालेल्या ढगफुटीमुळे नाशिक रोड भागातील विहितगाव, लॅम रोड भागातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या सुमारे १०० ते १२५ भाविकांपैकी ३० ते ४० भाविक ज्या ठिकाणी ढगफुटी झाली त्याच्या मागील बाजूस अडकले आहेत तर पुढे आलेले ६० ते ७० भाविक सुखरूप असून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांचा त्यांच्याशी संपर्क झाला आहे.
नाशिक : अचानक झालेल्या ढगफुटीमुळे नाशिक रोड भागातील विहितगाव, लॅम रोड भागातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या सुमारे १०० ते १२५ भाविकांपैकी ३० ते ४० भाविक ज्या ठिकाणी ढगफुटी झाली त्याच्या मागील बाजूस अडकले आहेत तर पुढे आलेले ६० ते ७० भाविक सुखरूप असून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांचा त्यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यांनी अडकलेले सर्व भाविकही सुखरूप असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, चौधरी यात्रा कंपनीबरोबर अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सर्व भाविकही सुखरूप असल्याचे यात्रा कंपनीच्या वतीने कळविण्यात आले आहेत. नाशिक रोड परिसरातील विहितगाव, लॅम रोड या भागातून सुमारे १०० ते १२५ भाविक सहा दिवसांपूर्वी रेल्वेने अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. गेल्या सोमवारी हे यात्रेकरू इच्छितस्थळी पोहोचल्यानंतर बुधवारपासून त्यांनी टेकडी चढण्यास सुरुवात केली होती. ज्यावेळी त्यांनी वरती जाण्यास सुरुवात केली त्यावेळी वातावरण चांगले होते. देवदर्शन आटोपून शुक्रवारी त्यांनी खाली उतरण्यास सुरुवात केली होती. परतीच्या वाटेवर असताना ६० ते ७० भाविक पुढे निघून आले होते. मात्र, ३० ते ४० लोक त्यांच्या मागून येत होते. शुक्रवारी सायंकाळी साडेचार-पाच वाजेच्या दरम्यान अमरनाथ गुहेच्या जवळ अचानक मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्याने धो-धो पाऊस बरसू लागला यामुळे मागे राहिलेले भाविक वरतीच अडकले. खाली आलेल्या यात्रेकरूंना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नाशिक रोड येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोठुळे यांच्याशी संपर्क साधला. कोठुळे यांनी त्वरित केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधून भाविकांना मदत करण्याचे आवाहन केले. केंद्रीय मंत्र्यांनी त्वरित चक्रे फिरवून माहिती घेतली. वर अडकलेले आणि खाली उतरलेले सर्व भाविक सुखरूप असल्याचे त्यांनी कोठुळे यांना कळविले आहे. खासदार गोडसे यांचाही भाविकांशी संपर्क झाला आहे. दरम्यान, चौधरी यात्रा कंपनीसोबत गेलेले सर्व म्हणजे चाळीस भाविकही सुखरूप असून जवळपास सर्व भाविकांशी संपर्क झाला असल्याचे कंपनीचे संचालक रामगोपाल चौधरी यांनी सांगितले.