सिन्नर : घोटी-सिन्नर महामार्गाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून ४३.५० कोटी रुपयांच्या निधीतून डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. रविवारी गावठा भागातील मारुती मंदिराजवळ खासदार गोडसे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे युवानेते उदय सांगळे, जिल्हा उपप्रमुख दीपक खुळे, तालुुकाप्रमुख सोमनाथ तुपे, जि. प. सदस्य निलेश केदार, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, नपाचे गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, शैलेश नाईक, पिराजी पवार आदी उपस्थित होते. मुंबई-नाशिक-पुणे या सुवर्ण त्रिकोणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या सिन्नर शहरातून मुंबईकडे जाण्याचा तसेच मुंबईच्या साईभक्तांना शिर्डी येथ्लृे जाण्यासाठी जवळचा सोपा मार्ग म्हणून घोटी-सिन्नर-शिर्डी महामार्गाचा वापर केला जातो. घोटी-सिन्नर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. शिर्डीला ये-जा करणाºया भाविकांची वाहने या मार्गावरून धावतात. तथापि गेल्या काही वर्षांपासून या महामार्गाची दयनीय अवस्था झाली होती.रस्त्याची झालेली दुरावस्था व अपघातांचे वाढते प्रमाण याचे गांभिर्य ओळखून खासदार गोडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे साकडे घातले होते. ना. गडकरी यांनी गोडसे यांची मागणी मान्य करत या रस्त्यासाठी ४३.५० कोटींचा निधी मंजूर केला.------------------------४०.५०० कि.मी. पर्यंत दुरुस्तीचे काम होणारसुमारे ५४ कि.मी. असलेल्या या रस्त्याचे ४०.५०० कि.मी. पर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर ०.५०० ते ४०.५०० पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. सद्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे ही दुरुस्ती करण्यात येणार असून यात रुंदीकरणाचा अंतर्भाव नसल्याचे अभियंता सोनवणे यांनी सांगितले.
सिन्नर-घोटी महामार्गासाठी ४३.५० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 9:07 PM