ऐन रोगराईत मनपाचे ५० टक्के दवाखाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:25 PM2018-10-13T23:25:50+5:302018-10-14T00:12:20+5:30
शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची साथ असताना महापालिकेचे ३० शहरी आरोग्य केंद्र म्हणजेच दवाखान्यांपैकी १५ दवाखाने चक्क बंद आहेत. याशिवाय गंगापूरगाव आणि सिन्नर फाटा रुग्णालय येथे प्रसूतिगृह असतानादेखील ते अनेक वर्षांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
नाशिक : शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची साथ असताना महापालिकेचे ३० शहरी आरोग्य केंद्र म्हणजेच दवाखान्यांपैकी १५ दवाखाने चक्क बंद आहेत. याशिवाय गंगापूरगाव आणि सिन्नर फाटा रुग्णालय येथे प्रसूतिगृह असतानादेखील ते अनेक वर्षांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्यानंतर आता रुग्णालये पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
सध्या शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूची साथ सुरू आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पाचशेच्या पुढे गेली आहे तर दोन जणांचा बळी गेला आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दीडशेच्या आत असली तरी आत्तापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे. शहरात आजही घरटी रुग्ण आहेत आणि सर्वच दवाखाने, रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी आहे. महापालिकेच्या वतीने त्यांच्या दवाखान्यात म्हणजे शहरी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांच्या आधारेच साप्ताहिक अहवाल लक्षात घेऊन वैद्यकीय विभाग नियोजन करीत असताना दुसरीकडे मूलभूत माहिती देणारी शहरी आरोग्य केंद्रेच बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. बहुतांशी शहरी आरोग्य केंद्रे सामान्य नागरिकांच्या वस्त्यांमध्ये आहेत. तेथील नागरिकांना उपचार तर मिळत नाहीतच शिवाय महापालिकेला शहरात कितपत रोगराई आहे, याबाबत अंदाज घेणेदेखील अडचणीचे झाले आहे. याशिवाय महापालिकेच्या रुग्णालयांपैकी गंगापूर आणि सिन्नर फाटा येथील रुग्णालयात व्यवस्था असूनही, तेथे महिलांची प्रसूती होत नाही. अपुरे डॉक्टर आणि कर्मचारी असे कारण त्यासाठी दिले गेले आहे.
रुग्णालये तातडीने सुरू करण्याचे आदेश
महापालिकेची सर्व पंधरा बंद रुग्णालये तातडीने सुरू करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी दिले आहेत. याशिवाय वैद्यकीय विभागासाठी किती डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, याबाबतही स्थायी समितीला माहिती सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत.