५६ बालकांनी दिला कोरोनाशी यशस्वी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:19 PM2020-06-06T17:19:23+5:302020-06-06T17:23:19+5:30
नाशिक : दोन महिन्यांपासून आलेल्या कोरोनाच्या संसर्गात अनेकजण होरपळले आहेत. जिल्ह्यातील ९७३ रुग्णांनी कोरोनाशी दोन हात करून हा लढा जिंकला आहे. या यशस्वी लढ्यात जिल्ह्यातील ५६ बालकांचाही समावेश आहे.
नाशिक : दोन महिन्यांपासून आलेल्या कोरोनाच्या संसर्गात अनेकजण होरपळले आहेत. जिल्ह्यातील ९७३ रुग्णांनी कोरोनाशी दोन हात करून हा लढा जिंकला आहे. या यशस्वी लढ्यात जिल्ह्यातील ५६ बालकांचाही समावेश आहे.
पालकांसह आरोग्य यंत्रणेचाही जीव टांगणीला लागला होता. मात्र आरोग्य यंत्रणेचे योग्य उपचार, पालक आणि बालकांची उपचारपद्धतीला मिळालेली साथ त्यामुळे आज जिल्ह्यातील ५६ बालके कोरोनामुक्त झाली आहेत. तसेच उर्वरित ३१ बालकेही लवकरच कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परततील, असा विश्वास आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे.
कोरोनाने पाच दिवसांच्या अर्भकापासून तर ९० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकालाही आपल्या विळख्यात घेतले आहे. मात्र अशा नाजूक परिस्थितीतही आरोग्य यंत्रणेने अतिशय दक्षतेने कोरोनाविरोधातील लढा सुरू ठेवल्याने त्याचे फलितसमोर येत आहेत. त्यामुळेच ही कोवळी बालके या कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडली आहेत.
जिल्ह्यात ० ते १२ वयोगटांतील पहिला कोरोनाबाधित बालक १० एप्रिल रोजी आढळून आले. त्यानंतर हा आकडा हळूहळू वाढत ८७ पर्यंत पोहोचला. कोरोनाचे रु ग्ण जसे मालेगावात जास्त आहेत, तसेच कोरोनाबाधित बालकांचे प्रमाणही मालेगावात सर्वाधिक आहे. मालेगावात ४३ बालकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात २६ मुले व १७ मुली आहेत. त्यापाठोपाठ येवला आणि नाशिकमध्ये प्रत्येकी चार, तर सिन्नर, चांदवड, निफाड येथील प्रत्येकी एका बालकाचा समावेश होता.