नाशिक : शेतकऱ्यांना निर्माण होणारी आर्थिक अडचण दूर व्हावी, त्यांना दिलासा मिळावा यासाठी पंतप्रधान किसान पेन्शन योजना राबविली जाते. शेतकऱ्यांना सन्मान देणारी ही पेन्शन योजना असली तरी कोणत्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल याविषयीचे निकष तयार करण्यात आलेले आहेत. परंतु असे निकष टाळून अनेक शेतकऱ्यांनी या याेजनेत नाव नोंदविल्याने अशा शेतकऱ्यांकडून आता वसुली सुरू करण्यात आली आहे. यामध्ये करदाते शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
जे शेतकरी आयकर भरत असतील किंवा शासकीय सेवेत असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. जो शेतकरी शेती करतो, परंतु शेत त्याच्या नावावर नाही तर त्याच्या वडिलांच्या, आजोबांच्या नावावर असेल तर अशाही शेतकऱ्याला लाभ दिला जात नाही. दुसऱ्याची शेती कसत असेल तर असा शेतकरीसुद्धा योजनेसाठी पात्र नाही. डॉक्टर्स, इंजिनीअर, सीए, वकील आदी व्यावसायिक असलेल्या शेतकऱ्यांनादेखील योजनेचा लाभ दिला जात नाही. असे सर्व निकष असले तरी अनेकांनी येाजनेत नावे नोंदविली. यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे आयकर भरणारे आहेत.
अशा शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी त्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यातील काही शेतकऱ्यांनी योजनेचे घेतलेेले पैसे परत केले असले तरी अद्यापही सुमारे ६५५० शेतकऱ्यांनी घेतलेले पैसे पुन्हा भरलेले नाहीत.
--इन्फो--
पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा
पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी
४८७५५७
आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी
६०७६
पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी
१२६२९
पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी
६५५०
--इन्फो--
आतापर्यंत ६१ लाख झाले वसूल
१) शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची पेन्शन तर तीन महा याप्रमाणे जमा केली जाते. यामध्ये अनेक अपात्र शेतकऱ्यांचादेखील समावेश आहे. आतापर्यंत अशा ६१,६७,०००० इतक्या शेतकऱ्यांकडून रक्कम जमा करण्यात आलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.
२) पीएम किसान योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी करदाते शेतकऱ्यांची संख्या मोठी असून त्यांची माहिती एकत्रित करून त्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. एकूण नोटीस पाठविलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही १२,६२९ इतकी असून त्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा पाठविण्याची वेळ आलेली आहे.
३) काही अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन ते तीनपेक्षा अधिक हप्तेदेखील जमा झाल्याची बाब उघड झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार नोटीस पाठविली जात आहे. पहिली वसुली झाल्यानंतरही अनेकांच्या खात्यावर दुसरी रक्कमही जमा झालेली आहे.
--इन्फो--
काही शेतकरी अजूनही लाभावाचून वंचित
दर तीन महिन्यांनी दोन हजार याप्रमाणे शेतकऱ्यांना पेन्शन देणारी ही योजना आहे. यातील पात्र-अपात्रतेबाबतचा घोळ कायम असताना जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याच्यादेखील तक्रारी अनेकदा समोर आलेल्या आहेत. सर्व निकष पूर्ण करीत असतानाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याचे सांगण्यात येते. बँकांमध्ये गेल्यानंतर पैसे जमाच झाले नसल्याचे सांगितले जाते. काही शेतकऱ्यांना केवळ पहिला हप्ता मिळतो, तर नंतरच्या दोन हप्त्यांसाठी प्रतीक्षा करावी लागते. काहींना तीनही हप्ते मिळतात, तर काहींना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागते. पेन्शन योजनेतील या घोळात अनेक उशिरा जमा होणाऱ्या निधीमुळेदेखील गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.