रिक्षा प्रवासात ६७ हजारांची रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 01:18 AM2021-08-11T01:18:23+5:302021-08-11T01:19:02+5:30
रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील ६७ हजार रुपयांची रोकड दोघा अज्ञात सहप्रवासी महिलांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील ६७ हजार रुपयांची रोकड दोघा अज्ञात सहप्रवासी महिलांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी येथील शाहू महाराजनगरमधील फिर्यादी सपना जगदीश सोनवणे या येथील बँकेत रक्कम भरणा करण्यासाठी आल्या होत्या. त्या कॅनडा कॉर्नर येथून रिक्षात बसल्या. त्यानंतर रिक्षा रविवार कारंजामार्गे पंचवटीत आली. तेथून दोन महिला व एक मुलगा रिक्षात सहप्रवासी म्हणून बसले. रिक्षा प्रवासादरम्यान सहप्रवासी महिला फिर्यादी सोनवणे यांना वारंवार लोटत होती, दुपारी चार वाजेच्या सुमारास सोनवणे दिंडोरी रोडवर असलेल्या रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ उतरल्या असता त्यांनी त्यांच्या जवळील पर्समधील रोकड तपासली असता रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांना अद्यापही चोरट्या महिलांचा शोध लागू शकलेला नाही.
---