नाशिक : एकीकडे शहराचे तपमान चालू महिन्यातच चाळिशीपार पोहचले असताना दुसरीकडे मात्र शहरातील वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा सर्रास प्रयत्न सुरू आहे. गंगापूररोडवरील जुन्या गोदापार्कमधील वृक्षराजीपैकी निलगिरीसह बांबू, अशोक या प्रजातींच्या एकू ण ८३ झाडांचे बुंधे अज्ञात इसमांनी जाळल्याचे जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला उघडकीस आले, हे दुर्दैवच. मात्र याकडे मनपा उद्यान विभागाने कानाडोळा करणे पसंत केल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरामधील वृक्षसंपदा जतन करणे व ती वाढविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून, शहराबाहेरील वृक्षसंपदेच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वनविभागाची आहे. सध्या शहरातील वृक्षराजीला कोणी वालीच राहिले नसल्याचे चित्र दिसत आहे. कुठल्याही प्रकारचा अडथळा नसला तरी सर्रासपणे तो वृक्ष तोडला जातो, तर दुसरीकडे छाटणीच्या नावाखाली वृक्षांचा केवळ बुंधा ठेवला जातो. तसेच महापालिकेचे कर्मचारी सांगून वृक्ष तोडण्याचा सपाटाही शहरातील विविध भागांमध्ये सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईदगाह मैदानावरील शेकडो वर्षे जुने वटवृक्ष अज्ञात इसमांनी कापून लंपास केले; मात्र त्याची कुठलीही दखल महापालिकेच्या संबंधित विभागाने घेतली नाही. वृक्ष संरक्षण अधिनियमानुसार विनापरवानगी वृक्षतोड करणे गुन्हा ठरतो. मात्र या कायद्याची अंमलबजावणीबाबत संबंधित शासकीय यंत्रणा उदासीन आहे. गोदापार्क परिसरात बांबू, निलगिरी, अशोक, कडूनिंब, कदंब अशा विविध प्रजातीचे डौलदार वृक्ष आहे.वटवाघळांचा अधिवास धोक्यातनिलगिरी वृक्षांवर शेकडोंच्या संख्येने वास्तव्यास असलेल्या वटवाघळांचा अधिवास झाडांच्या बुंध्यांना लावलेल्या आगीमुळे असुरक्षित बनला. आगीमुळे येथील वटवाघळे सैरभैर होऊन शासकीय रोपवाटिकेमधील झाडांवर स्थलांतरित झाले. येथील वृक्षसंपदेवर वटवाघळांची वसाहत आहे. त्यांच्या संवर्धन व संरक्षणाऐवजी वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा प्रताप होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशा या विकृ त प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.झाडांना कमकुवत करण्याचा प्रयत्ननिलगिरी वृक्षाला औषधी महत्त्व असून, येथील उंच हिरव्यागार वृक्षांची कत्तल करणे अवघड असल्यामुळे झाडांना कमकुवत करण्यासाठी तस्करांनी बुंधे पेटविल्याची चर्चा आहे. बुंधे पेटविल्यामुळे झाडे आपोआप कोसळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्यानंतर या झाडांची विल्हेवाट लावणे सोपे होईल, हा यामागील उद्देश असल्याचाही संशय घेतला जात आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची मागणी होत आहे.
८३ झाडांचे बुंधे जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:16 AM