जिल्ह्यात प्राथमिक शाळांच्या ८८१ वर्गखोल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:25+5:302021-06-16T04:19:25+5:30
नाशिक : गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१ ...
नाशिक : गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या धोकादायक झाल्या असून, अशा वर्गखोल्या पाडण्याचा निर्णय जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या असल्या तरी, काही खोल्या पाडण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी नसल्याने त्या तशाच असून, ज्या ठिकाणी खोल्या पाडण्यात आल्या, तेथील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे सर्वप्रथम पसरविण्यात आले. त्यासाठी काही गावांमध्ये ग्रामस्थांनीच पुढाकार घेत शाळांसाठी जागा व लोकवर्गणीतून खोल्यांचे बांधकाम तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी करून दिले आहे. त्यानंतर शासनाकडूनही ज्ञानाची गंगा आणखी बळकट करण्यासाठी शाळा खोल्यांचे बांधकाम करून देण्यात आले. अशा शाळांमधून आजवर हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. मात्र, आता देखभाल व दुरुस्तीअभावी खोल्यांची परवड होत आहे.
-----
पॉइंटर्स -
जिल्ह्यातील एकूण शाळा- ३३२४
एकूण विद्यार्थी -
एकूण वर्गखोल्या -१२,९९३
वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक - ८८१
-----
कोणत्या तालुक्यात किती धोकादायक?
बागलाण- ९१
चांदवड- ८७
देवळा- १३
दिंडोरी- ६५
इगतपुरी- ८३
कळवण- ६६
मालेगाव- ८९
नांदगाव- ४७
नाशिक- ३२
निफाड- ५५
पेठ- २२
सिन्नर- ७८
त्र्यंबक- १०
सुरगाणा- ४५
---
धोकादायक खोल्या जैसे थे
जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याकडून धोकादायक वर्गखोल्यांची माहिती मागविली असून, २९६ प्राथमिक शाळांच्या सुमारे ८८१ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, पाडण्यासाठी येणाऱ्या खर्चाची कोणतीही तजवीज शिक्षण विभागाकडून केली जात नसल्याने धोकादायक वर्गखोल्या जैसे थे आहेत. शासनाकडून अन्य शैक्षणिक बाबींवर वारेमाप खर्च केला जातो. मात्र, शाळांची दुरुस्ती वा नवीन शाळांच्या बांधकामाबाबत हात आखडता घेतला जात असल्याने वर्षानुवर्षे वादळी वारा, तडाख्याच्या पावसाचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील शाळांची दुरवस्था कायम आहे.
----
अशा शाळेत मुले पाठवायची कशी?
जिल्ह्यातील शाळा सध्या बंद आहेत. त्यामुळे मुले घरूनच अभ्यास करतात. परंतु शाळा सुरू झाल्यानंतर पावसाळ्यात शाळेच्या आवारात असलेल्या धोकादायक वर्गखोल्या पावसाळ्यात कधीही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे मुलांच्या जीविताला धोका असताना मुलांना शाळेत कसे पाठवावे याबाबत संभव आहे.
सोमनाथ जाधव, पालक
-----
पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे चांगल्या शाळांमध्ये अनेकदा मुलांना पाठविण्याची भीती वाटते. अशा परिस्थितीत शाळेच्या आवारात मोडकळीस आलेली इमारत असेल तर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. शिक्षक काळजी घेत असले तरी अनेकदा मुले अशा धोकादायक वर्गखोल्यांच्या आसपास फिरकून दुर्घटना होण्याची भीती असल्याने सतत चिंता लागलेली असते.
अशोक गायकर, पालक
---