नाशिक/ मुंबई: ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ९४ वे साहित्य संमेलन २६, २७, २८ मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते.
राज्यभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशकात मार्च अखेरीस होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कसे होणार यावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. तसेच कोरोनाचा उद्रेक पाहता संमेलनाचा अट्टाहास कशासाठी, असा सवालही साहित्य वर्तुळातून केला जात होता.
नाशिक शहरात कुठल्याही प्रकारच्या धार्मिक किंवा सामाजिक सोहळ्यांच्या आयोजनास परवानगी नाही. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात संचारबंदीदेखील लागू आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे.